वीजविषयक जनजागृती, प्रबोधन, कर्मचारी प्रशिक्षण कामांचे मानांकन जाहीर महावितरणच्या २५ प्रशिक्षण केंद्रांमध्ये ‘पुणे’ अव्वल

0
302

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – नागरिक, विद्यार्थी, विविध एजन्सीजचे कर्मचारी यांच्यासह महावितरणचे अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, कार्यशाळा, प्रबोधन व जनजागृतीसाठी महावितरणच्या मुख्य प्रशिक्षण केंद्राने राज्यातील २५ लघु प्रशिक्षण केंद्रांचे सन २०२२-२३ मधील मानांकन नुकतेच जाहीर केले आहे. यात पुणे परिमंडलाच्या लघु प्रशिक्षण केंद्राने प्रथम क्रमांकाचे स्थान पटकावले आहे.

पुणे परिमंडलाच्या गणेशखिंड येथील लघु प्रशिक्षण केंद्राने गेल्या आर्थिक वर्षामध्ये एकूण ८८ प्रशिक्षण वर्गांच्या माध्यमातून वर्ग एक ते चारमधील ४ हजार ९३० अभियंता, अधिकारी, नियमित व बाह्यस्त्रोत कर्मचारी तसेच १८ हजार ३२० वीजग्राहक, शालेय व अभियांत्रिकी विद्यार्थी, अप्रेंटीस, सौर ऊर्जा प्रकल्प, विद्युत वाहने चार्जिंग स्टेशन्स, मीटर रीडिंग एजन्सीचे कर्मचारी अशा एकूण २३ हजार २५० जणांना विविध विषयांवर प्रशिक्षण दिले आहे.

मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार व लघु प्रशिक्षण केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष पटनी यांच्या पुढाकाराने पुणे परिमंडलामध्ये विविध विषयांवरील प्रशिक्षणाला मोठा वेग देण्यात आला आहे. त्याची फलनिष्पत्ती म्हणून नाशिक येथील मुख्य प्रशिक्षण केंद्राने दिलेले लक्ष्य पुणे परिमंडलाने तब्बल १९७ टक्क्यांनी पूर्ण करीत राज्यात अव्वल स्थान मिळविले आहे. यासाठी मुख्य महाव्यवस्थापक श्री. देवेंद्र सायनेकर (नाशिक), अधीक्षक अभियंता श्री. प्रकाश राऊत व श्री. सतीश राजदीप यांचेही सहकार्य मिळाले.

महावितरण अंतर्गत अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांना विद्युत सुरक्षा, उपकेंद्र व वितरण यंत्रणेची देखभाल व दुरुस्ती, अॅडव्हान्स मीटरींग इन्फ्रास्ट्रक्चर, सौर ऊर्जा, विद्युत वाहने, वीजचोरी रोखण्याच्या उपाययोजना, प्रथमोपचार, ताणतणाव व्यवस्थापन, अचूक बिलींगसाठी उपाययोजना आदी विषयांवर तसेच घरगुती व सार्वजनिक विद्युत सुरक्षा, महावितरणची डिजिटल ग्राहकसेवा, वीजबचत आदींबाबत शहरी व ग्रामीण भागात मेळावे, पथनाट्य, शाळा व महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षण व प्रबोधन वर्ग आदींद्वारे नागरिकांना व विद्यार्थ्यांना प्रबोधन करण्यात येत आहे. तर सौर ऊर्जा निर्मित प्रकल्प, विद्युत वाहने चार्जिंग स्टेशन्स, मीटर रीडिंगच्या एजन्सीजच्या कर्मचाऱ्यांना नियमित प्रशिक्षण देण्यात येत आहे. सोबतच २२ अभियांत्रिकी पदवी व पदविका महाविद्यालयांसोबत ज्ञानाचे आदानप्रदान अंतर्गत सामंजस्य करार केले आहेत. या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना अद्ययावत तंत्रज्ञान, वितरण यंत्रणेच्या माहितीसह विविध विषयांवर प्रशिक्षण देण्यात येत आहे.

मनोगत- ‘वीजक्षेत्रात ग्राहकाभिमुख प्रशासन व दर्जेदार सेवा देण्यासाठी बदलत्या तंत्रज्ञानाशी सुसंगत प्रशिक्षण अतिशय आवश्यक आहे. पुण्याच्या लघु प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षणांचा वेग व विषयांची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. त्यायोगे मागील आर्थिक वर्षात १९७ टक्के लक्ष्य साध्य करता आले याचे निश्चितच समाधान आहे’. – राजेंद्र पवार, मुख्य अभियंता, पुणे परिमंडल.