दोन महिन्यात दोन चित्त्यांचा मृत्यू, मादी साशानंतर आता नर उदयने घेतला जगाचा निरोप

0
534

मध्यप्रदेश, दि. २४ (पीसीबी) – कुनो नॅशनल पार्कमध्ये आणखी एका चित्त्यांच्या मृत्यूचे वृत्त आले आहे. मध्य प्रदेश राज्यातील कूनो पार्कमधील नर चित्ता उदयचा मृत्यू झाला आहे. वृत्तसंस्था पीटीआयने वन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वीत कूनोमध्ये मादी चित्ता साशा हिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता ‘चीता प्रोजेक्ट’ला आणखी धक्का बसला आहे.

वन विभागाकडून सांगण्यात आले आहे की, रविवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास चित्ता उदय मान खाली घालून जमिनीवर पडलेला दिसून आला. त्याच्या जवळ गेल्यानंतर तो लंगडत व मान खाली घालून चालताना दिसला. त्यानंतर याची सूचना वन्यप्राणी चिकित्सकांना देण्यात आली. त्यानंतर उदयची तपासणी केल्यानंतर तो आजारी असल्याचे दिसून आले.

उदयला उपचारासाठी ट्रॅकुलाइज केले गेले. सकाळी ११ वाजता चित्त्याला बेशुद्ध करून त्याच्यावर उपचार सुरू केले गेले. उदयची प्रकृती पाहून त्याला पुढील उपाचर व निरीक्षणासाठी आयसोलेशन वार्डात ठेवले गेले. मात्र सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. उद्यच्या मृत्यूचे कारण अजून समोर आले नाही.

गेल्या महिन्यात कूनो नॅशनल पार्कमध्ये मादी चित्ता साशाचा मृत्यू झाला होता. तिला किडनी व यकृताचा आजार होता. साशाची क्रिएटिनिन पातळी ४०० हून अधिक झाली होती. नामीबियाहून आणण्यापूर्वीच साशाची तब्येत बिघडली होती. ती व्यवस्थित खात नव्हती.