6 नायजेरियन तरुणांनी डेटिंग अँपच्या मदतीने ७०० भारतीय महिलांना घातला गंडा; प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि…..

0
182

नवी दिल्ली, दि. २१ (पीसीबी) : 4G आणि 5G च्या या युगामध्ये इंटरनेट वापरामुळे आयुष्य अधिक सुखकर झाले असले तरी यामुळे सायबर गुन्हेगारीतही वाढ झाली आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि डेटिंग अॅपच्या मदतीने आर्थिक फसवणूक झाल्याची अनेक प्रकरणं समोर येत आहेत. अशाच डेटिंग अॅपच्या मदतीने 6 नायजेरियन तरुणांनी तब्बल 700 हिंदुस्थानी महिलांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी नोएडातील गौतम बुद्ध नगर पोलिसांनी सात विदेशी नागरिकांसह आठ जणांना अटक केली आहे.

आरोपी महिलांना आलिशान गिफ्ट देण्याचे आमिष दाखवायचे आणि त्यांच्याकडून पैसे उकळायचे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतरही महिलांनी बदनामीच्या भीतीने पोलिसात तक्रार दाखल केली नाही. परंतु एका महिलेने हिंमत दाखवत तक्रार दाखल केली आणि या टोळीचा भांडाफोड झाला. पोलिसांनी टोळीच्या मुसक्या आवळल्या असून यात 6 नायजेरियन तरूण, एक नायजेरियन तरुणी आणि एक हिंदुस्थानी तरुणीचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 3 लॅपटॉप, 31 मोबाईल, 31 हजारांची रोकड, 5 पासपोर्ट, 1 आधार कार्ड, 1 पॅन कार्ड, 1 मतदान कार्ड आणि 1 बँक पासबूक जप्त केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डेटिंग अॅपच्या माध्यमातून आरोपी हिंदुस्थानी महिलांशी मैत्री करायचे. त्यानंतर आपण नौदल अधिकारी असल्याचे भासवून त्यांचा विश्वास जिंकायचे. यासाठी आरोपी गुगलवरील नौदल अधिकाऱ्यांचा फोटोही प्रोफाईलला लावायचे. त्यानंतर महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना भेटवस्तू किंवा परदेशी चलन पाठवण्याचे आमिष दाखवायचे. यासाठी ते भेटवस्तूं आणि पार्सलचे फोटोही महिलांना पाठवायचे. काही दिवसांनी महिलांना फोन करून महागड्या भेटवस्तू आणि विदेशी चलन पाठवले आहे, मात्र त्याची कस्टम ड्युटी जमा करायची असल्याचे सांगून त्यांच्याकडून पैसे उकळायचे.

आरोपींची संघटित टोळी असून हे सर्व नायजेरिया, घाना, अबिदजान येथील रहिवासी असून 2021मध्ये ते शिक्षण आणि उपचाराच्या व्हिसावर हिंदुस्थानात आले होते. त्यांच्या व्हिसाचा कालावधी संपून 6 महिने झाले असून ते अवैधरित्या हिंदुस्थानमध्ये राहत होते. गेल्या वर्षभरात त्यांनी देशातील 600-700 महिलांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. एका महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरोधात कलम 420, आयटी अ२क्ट 66 आणि 66 (डी) अन्वये गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.

डेनियल जॉन (घाना), केल्विन ओकाफोर गुइस (नायजेरिया), उचेना एगबू (नायजेरिया), जोनास डेक्का (घाना), हिबिब फोफाना (आयव्हरी कोस्ट), इक्सा सगीर (नायजेरिया) आणि ओयोमा लिसा डोमेनिक (नायजेरिया) अशी आरोपींची नावे आहेत. यासह सिक्कीम येथील गंगटोक येथे राहणारी राधिका छेत्री नावाची महिलाही त्यांच्या टोळीसाठी काम करत होते. ती स्वत: कस्टम अधिकारी असल्याचे भासवून पीडितांची फसवणूक करत होती