…तर पिंपरी चिंचवड शहरातील भाजपची सद्दी संपेल

0
559

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या आठवडाभरात खूप मोठ्या घडामोडी सुरू आहेत. अजित पवार यांच्यावर सर्वांच्या नजरा खिळल्यात. सर्वोच्च न्यायालयात एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरणार आणि राज्य सरकार कोसळणार, हे आता जवळपास निश्चित समजायला हरकत नाही. निकाल केव्हा लागणार ते माहित नाही, पण ज्या काही घडामोडी सुरू आहेत त्याच खूप बोलक्या आहेत. शिंदे-फडणवीस सरकरा कोसळले तर राष्ट्रवादीचे ३० आमदार घेऊन नव्याने सरकार तयार करण्याचा पर्याय भाजपने तयार केला आहे. त्यात अजित पवार हे मुख्यमंत्री असतील आणि राष्ट्रवाचे रथीमहारथी दिग्गज २० मंत्री कॅबिनेटमध्ये राहतील, अशीही चर्चा आहे. आता ही चर्चा खरी की खोटी त्याबाबत आताच निश्चित सांगता येत नाही.

परिस्थितीजन्य पुरावे, नेत्यांची विधाने, गाठीभेटी मात्र स्पष्ट करतात की अजितदादा भाजपच्या वाटेवर आहेत. मग आता त्यामागचे खरे कारण राज्य सहकारी बँकेचे कर्ज प्रकरण असो, जरंडेश्वर साखर कारखान्याचा व्यवहार असो वा सिंचन घोटाळ्याची शुक्लकाष्ट. एक मात्र छातीठोकपणे सांगता येईल की ईडी च्या फेऱ्यातून सुटायचे किंवा तात्पुरते संकट टाळायचे तर भाजपला शरण गेल्याशिवाय दादांनाही दुसरा पर्याय शिल्लक नसावा. असो…

खरोखर आजवर तीस वर्षे आमदारकीसह आठ-दहा खात्यांचे मंत्री, तब्बल चार वेळा उपमुख्यमंत्री आणि आता विरोधीपक्षनेते राहिलेले अजितदादा मुख्यमंत्री झालेच तर… अजितदादा हे भाजपसाठी संकटमोचक ठरतील. राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री सुप्रियाताई सुळे यांच्या डोक्यावर मुख्यमंत्रीपदाचा मुगूट ठेवायचा हे खुद्द शरद पवार यांचे स्वप्न आहे. तसे असेल तर दादा पुढचे दहा वर्षे या पदावर बसू शकत नाहीत. स्वतः शरद पवारसाहेब ते होऊ देणार नाही. त्यापेक्षा आता ही अचूक संधी मिळालीच असेल तर अजितदादांनी तसा निर्णय केला तर त्यात वावगे वाटू नये. पवार यांच्या घरात कुटुंबकलह आहे हे मागे मावळ लोकसभेला पार्थ पवार यांना उमेदवारी देताना जे महाभारत घडले ते महाराष्ट्राने पाहिले. अशा परिस्थिती काकांच्याच बंडखोरीचा वारसा घेऊन आता अजितदादा बंडखोरी कऱणार असतील तर तेसुध्दा क्षम्य म्हणावे लागेल. होय, एक नक्की आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या तोडिस तोड असा एक बिनधास्त `मराठा` नेता भाजपच्या गळाला लागलाच, तर मात्र आगामी लोकसभा, विधानसभा आणि दोन-चार महिन्यांत झाल्याच तर महापालिका, जिल्हापरिषद निवडणुकांसाठी भाजपला मैदान एकदम साफ झाले असे समजा. राज्याच्या राजकारणात अजितदादा पर्व सुरू होईल. अजितदादांचा रोखठोक स्वभाव, २४ तास कार्यमग्न अशी कार्यशैली पाहता कदाचित खुद्द फडणवीस यांना नंतर नंतर नाकापेक्षा मोती जड होईल. न जाणो नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना महाराष्ट्राची जातीय समिकरणे आणि राजकारण साधण्यासाठी अजितदादा हा खूप मोठा दुवा ठरेल. हे सर्व जर तर आहे, पण ते शक्य आहे, अशक्यही नाही. राजकारणात काहीपण होऊ शकते.

अजित पवार भाजपच्या बाजुला गेले तर राष्ट्रवादीचे काय होणार, शिवसेना काय करणार किंवा काँग्रेससह अस्तित्वात असलेली महाआघाडीचे भवितव्य काय हा प्रश्न आहेच. तूर्तास असे दिसते की पूर्वी शिवसेना जात्यात होती आता राष्ट्रवादी काँग्रेसची वेळ आहे. शिवसेनेचे घर फुटले तेव्हा राष्ट्रवादीलाही गुदगुल्या झाल्या होत्या, पण काळ मोठा चमत्कारीक असतो. आता राष्ट्रवादीच्या घराचे वासे फिरलेत आणि घरसुध्दा गोलगोल फिरते आहे. ईडी च्या कचाट्यातून सुटायचे तर दुसरा तोडगा नसल्याने खुद्द शरद पवार सुध्दा काहीच बोलू शकत नाहीत.

एकनाथ शिंदे यांनी आमचीच शिवसेना खरी म्हणत ४० आमदारांसह ठाकरेंच्या नेतृत्वालाच सुरूंग लावला होता. कारण तेसुध्दा ईडी च्या फेऱ्यात होते. आदित्य ठाकरे यांनी दोनच दिवसांपूर्वी सांगितले की, शिंदे हे मातोश्रीवर येऊन रडले आणि ईडी ची अटक टाळायची तर दुसरा पर्याय नसल्याचे सांगून तिकडे गेले. गेल्या नऊ महिन्यांत जे जे शिवसेनेबाबत घडले आता तेच राष्ट्रवादी बरोबर सुरू आहे. भाजपला हे दोन्ही बलडंद प्रादेशिक पक्षा तसे नको आहेत, पण त्यांच्याशिवाय सत्ताही मिळू शकत नाही म्हणून तोडफोडीशिवाय पर्याय नाही.

ठाकरे यांच्या शिवसेनेबद्दल आजही जनतेच्या मनात प्रचंड सहानुभूती आहे आणि निवडणुक झाल्याच तर भाजपच्या धुऱ्या वर होतील, असे सर्वेक्षण सांगते. मग आता लोकांचे लक्ष विचलित करायचे म्हणून दुसरा डाव भाजपने खेळला आहे. त्यात महाआघाडीची वज्रमूठ खूप महागात पडणार म्हणून त्यावरच प्रहार केला. अजित पवार मुख्यमंत्री झालेच तर ती महाआघाडी आणि ती वज्रमूठ मोडीत निघणार आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील भाजपची सद्दी संपेल –
बारामती हे अजित पवार यांचे घर, पण पिंपरी चिंचवड ही त्यांची खरी राजधानी. १९९२ पासून दादांनी पिंपरी चिंचवड शहर वाढवले, जोपासले. खेड्याचे नगर आणि आता स्मार्ट सिटी पर्यंत ही नगरी आली त्यात नाही म्हटले तरी ७० टक्के वाटा अजित पवार यांचा आहे. इथले रस्ते, लाईट, पाणी, कचरा, उद्यान, पूल, उड्डण पूल कोणताही प्रकल्प असू देत त्याच्या भूमिपूजन आणि उद्याघटनाच्या कोनशिलेवर अजित पवार हेच नाव दिसेल. मोदी लाटेत वारे फिरले आणि राष्ट्रवादीचेच ७० नगरसेवक भाजपमध्ये गेले आणि अजितदादांच्या गडाला सुरूंग लागला. दादांचे सरदार असलेले दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे हे फितूर झाले आणि फडणवीस यांनी या शहरात डाव मांडला.

पाच वर्षांत भाजपने महापालिका धुवून खाल्ली. सायकलवरचे पुढारी किमान ४-५ शे कोटींचे धनी झाले. हमारी बिल्ली हमसे मॅंऊ अशी गत झाली. ज्यांना अजित पवार यांनी पुढारी केले तेच दादांना शहाणपण शिकवायला लागले. शरद पवार यांना साडेतीन जिल्ह्यांचे पंतप्रधान म्हणण्या पर्यंत त्यांची मजल गेली. महाराष्ट्राच्या स्वयंघोषित दादाला पिंपरी चिंचवडमध्ये टू व्हिलरवर फिरायला लावले, अशी घमेंडखोर भाषा आमदार महेश लांडगे यांच्याच कट्टर समर्थक नगरसेवकांनी केली. बाडग्याला धर्माभिमान अधिक असतो, त्यामुळे आम्ही किती कडवट राष्ट्रवादी विरोधक आहोत, हे भाजपला दाखविण्यासाठी वाट्टेल ती टीका भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केली. आता अजित पवार यांनीच भाजपच्या बरोबरीत मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तर या टीकाकारांचे काय होणार हा प्रश्न आहे.

मुळात पिंपरी चिंचवड शहरात उद्या भाजपचे अस्तित्व शिल्लक राहिल का याबाबत साशंकता आहे. कारण जे ७० नगरसेवर राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेले तेच पुन्हा राष्ट्रवादीत येतील. कारण कितीही नाही म्हटले तरी फडणवीस यांच्यापेक्षा अजित पवार हेच अधिक जवळचे असतील. वाघाचे कातडे पांघरलेले दादा, भाई सगळे गपगार होतील. कदाचित वैर विसरून अजित पवार यांच्या पायाशी येतील. कारण राजकारणाचा बाजार मांडलेल्या या नेते मंडळींना उजवी किंवा डावी विचारसरणी नाही. वैचारीक दिवाळखोरी असलेले गल्लीतले टपोरी इथे पुढारी झाल्याने आज या शहराचा कडेलोट व्हायची वेळ आली आहे.

भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. लाडके शहर म्हणून अजित पवार मुख्यमंत्री झाल्यावर निश्चितच या शहराला झुकते माप देतील. सत्ता नसल्याने आलेली मरगळ दूर होईल. राष्ट्रवादीतून परागंदा झालेले पुन्हा घरट्यात येतील. कदाचित जगताप, लांडगेसुध्दा त्यात असतील. पुढचा चिंचवड, भोसरी आणि अर्थात पिंपरीचा आमदारसुध्दा राष्ट्रवादीचा असेल. इतकेच नाही तर मावळ लोकसभेचे भंग पावलेले स्वप्न अजितदादांना प्रत्यक्षा आणता येईल.

शिरूर मध्ये आताचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे तळ्यातमळ्यात थांबेल किंवा अजित पवार थेट भाजपवासी झाले आणि हिंदुत्वाचे गोडवे गाऊ लागले तर डॉ. कोल्हे हे भाजपचे खासदार असतील. पिंपरी चिंचवड शहरावर पुन्हा एकहाती अजित पवार यांची सत्ता येईल यात तिळमात्र शंका नाही. असो. प्रथम अजितदादा मुख्यमंत्री होऊ देत.