पुणे महापालिकेत ३४ गावांचा समावेश ! क्षेत्रफळाच्याबाबतीत मुंबईलाही टाकले मागे

0
254

पुणे, दि. १३ (पीसीबी) – काही महिन्यांपूर्वी ३४ गावांचा पुणे महापालिकेत नव्याने समावेश झाल्याने पुणे महापालिकेची हद्द 485 चौरस किलोमीटर होऊन पुण्याने मुंबईलाही क्षेत्रफळाच्या बाबतीत मागे टाकले आहे. ३४ गावांमधील आठ ते नऊ लाख लोकसंख्याही पुणे महापालिकेत आली आहे. त्यामुळे पुणे महापालिकेचं विभाजन करण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. अशा परिस्थितीत आता हडपसर, वाघोली या नवीन महापालिकेची घोषणा होऊ शकते, अशी चर्चा आहे.

पुणे महापालिकेत समाविष्ट केलेली फुरसुंगी आणि उरूरी दोन ही गावं वगळून स्वतंत्र नगरपरिषद अस्तित्वात येणार आहे. मात्र या दोन गावांमध्ये महापालिकेची 200 कोटी रुपयांची मिळकत कर थकीत आहे. महापालिकेला आता या दोन गावाचा कर वसूल करण्याचा अधिकार राहिलेला नाही. मात्र नवीन नगरपरिषद अस्तित्वात आल्यानंतर नियमानुसार थकबाकी वर्ग केली जाणार आहे.

पुणे महापालिकेचे विभाजन करुन आणखी एक महापालिका निर्माण करावी, अशी मागणी राजकीय नेत्यांसह स्थानिक नागरिकांनी शिंदे-फडणवीस सरकारकडे केली आहे. या मागणीची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. पुण्यातील नव्या महापालिकेसाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. त्यात हडपसर- वाघोली अशी नवीन महापालिका तयार कऱण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी छोट्या महापालिका असण्याची गरज व्यक्त करतानाच ते सुचित केले.

राज्याच्या नगरविकास विभागाने याबाबत पुणे महापालिकेला पत्र पाठवले आहे. नगरविकास विभागाने याबाबतचा अभिपाय पुणे महापालिकेकडे मागवली आहे. पुणे महापालिका आठवडा भरात या बाबतचा अभिप्राय सरकारकडे पाठवणार आहे. महापालिकेत 34 गावांच्या समावेशानंतर स्वतंत्र महापालिकेच्या मागणीने जोर धरला आहे. पालिकेत येऊनही समाविष्ट गावांना पायाभूत सोयी-सुविधा मिळत नसल्याची ओरड होत आहे. त्यातच उरुळी देवाची आणि फुरसुंगी या गावांना महापालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय गतवर्षाच्या अखेरीस घेतला.

34 गावांच्या समावेशानंतर पुणे ही क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यातील सर्वांत मोठी महापालिका बनली आहे. त्यात आता पुणे आणि खडकी कॅन्टोमेन्टचे विलिनीकरणही महापालिकेत करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे महापालिकेचा पसारा आणखी वाढणार आहे. आता महापालिकांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे स्वतंत्र महापालिका घोषित करण्यासाठी ही योग्य वेळ असल्याची चर्चा आहे.