भारताचा विजय..! सलग चौथ्यांदा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी केली आपल्या नावावर

0
453

अहमदाबाद, दि. १३ (पीसीबी) – भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथी कसोटी अनिर्णित राहिली. न्यूझीलंडने पहिल्या कसोटीत श्रीलंकेवर थरारक विजय मिळवून भारताचा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा केला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीला फार अर्थ नाही उतरला. ट्रॅव्हिस हेड व मार्नस लाबुशेन या जोडीने भारताची डोकेदुखी वाढवताना ऑस्ट्रेलियाला आघाडी मिळवून दिली. ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव २ बाद १७५ धावांवर जाहीर केला. ही कसोटी ड्रॉ राहिली आणि भारताने बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २-१ अशी जिंकली.

ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ४८० धावांच्या प्रत्युत्तरात विराटने अक्षर पटेलसह सहाव्या विकेटसाठी १६२ धावांची भागीदारी केली. विराट ३६४ चेंडूंत १५ चौकारांच्या मदतीने १८६ धावांवर झेलबाद झाला. भारताने ९ बाद ५७१ धावा करताना ९१ धावांची आघाडी घेतली. तत्पूर्वी, रोहित शर्मा ( ३५), चेतेश्वर पुजारा ( ४२), रवींद्र जडेजा ( २८), केएस भरत ( ४४) यांनी चांगली खेळी केली. शुबमन २३५ चेंडूंत १२ चौकार व १ षटकारासह १२८ धावांवर बाद झाला.

पाचव्या दिवसाच्या सुरुवातीला आर अश्विनने पहिली विकेट मिळवून दिली. नाईट वॉचमन म्हणून आलेला मॅथ्यू कुहुनेमन ६ धावांवर LBW झाला. ट्रॅव्हिस हेड व मार्नस लाबुसेन यांनी दुसऱ्या विकेटसाठी २९२ चेंडूंत १३९ धावांची भागीदारी केली. अक्षर पटेलने ही जोडी तोडली. त्याने टाकलेल्या अप्रतिम चेंडूवर ट्रॅव्हिसचा त्रिफळा उडाला. ट्रॅव्हिस १६३ चेंडूंत ९० धावांवर बाद झाला. सामन्याचा निकाल काहीच लागणार नाही असे दिसत असताना रोहितने शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा यांच्याकडूनही गोलंदाजी करून घेतली. ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव २ बाद १७५ धावांवर जाहीर केला.

भारताने सलग चौथ्यांदा बॉर्डर गावस्कर ट्रॉफी नावावर केली. २०१७, २०१८-१९, २०२०-२१ आणि २०२३ मध्ये भारताने ही ट्रॉफी जिंकली. घरच्या मैदानावरील भारताचा हा १६ वा कसोटी मालिका विजय आहे.