पिंपरी, दि. १० (पीसीबी) – फेसबुक इन्स्टंट आर्टिकल पुढील महिन्यापासून बंद होणार आहे. फेसबुकवर येऊन युजर वाचत नाही. त्याचा कल पाहण्याकडे आहे आणि तो वाढत वाढत आता जवळपास ९७ टक्क्यांच्या जवळ गेला आहे. त्यामुळे उरलेल्या ३ टक्के युजर्ससाठी इन्स्टंट आर्टिकलचे फिचर देण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळे एप्रिल २०२३ पासून फेसबुककडून इन्स्टंट आर्टिकल बंद करण्यात येणार आहे. खुद्द मेटाने या संदर्भातील माहिती दिली आहे.
इन्स्टंट आर्टिकल बंद होणार याचा अर्थ त्यामाध्यमातून येणारे युजर्स किंवा ट्रॅफिक कमी व्हायला लागणार आणि परत ते पूर्ववत करणे जवळपास अशक्य असणार. सध्या फेसबुकवर जवळपास ३७ हजार पब्लिशर्स इन्स्टंट आर्टिकल सुविधेचा वापर करतात. त्यातही मध्यम आणि लहान स्वरुपाच्या पब्लिशर्ससाठी इन्स्टंट आर्टिकल पैसे कमाविण्याचे आणि ट्रॅफिक आणण्याचे चांगले साधन होते. पण ते बंद होणार असल्याने त्याचा फटका निश्चितपणे डिजिटल माध्यमातील सर्व पब्लिशर्सना भोगावा लागणार आहे.
एकीकडे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स बॉट्स अर्थात चॅट जीपीटी, बार्ड एआय यांच्यामुळे न्यूज वेबसाईट्सपुढे आव्हान उभे राहिलेच आहे. त्यातही यामध्ये होत असलेल्या सुधारणा आणि ग्राहकांमध्ये हे बॉट्स कसे वापरायचे याची वाढत असलेली जागरुकता यामुळे पुढील काळात माहिती घेण्यासाठी किंवा रेफरन्ससाठी न्यूज वेबसाईटवर येण्याची शक्यता कमी कमी होत जाणार.
ब्रेकिंग न्यूज न मागताच देणारी हजारो प्लॅटफॉर्म्स किंवा हँडल्स तयार झाली आहेत. त्यामुळे त्यासाठीही न्यूज वेबसाईटवर जाण्याची गरज नाही. गेल्या काही वर्षांपासून टेक्नॉलॉजीत होत असलेल्या बदलांमुळे आणि सुधारणांमुळे न्यूज पब्लिशर्स सतत वेगवेगळ्या आव्हांनांना सामोरे जात आहेत. या बदलांची गती खूप वेगवान आहे. एखादा बदल आत्मसात करून त्या प्रमाणे बिझनेस आणि इतर रचना करेपर्यंत तो बदल मागे पडलेला असतो आणि नवे काहीतरी आलेले असते. सोशल मीडियातून येणारे ट्रॅफिक येत्या काळात कमी कमी होत जाणार ही सगळ्याच डिजिटल माध्यमविश्वासाठी धोक्याची घंटा आहे. कारण सोशल मीडियातून येणाऱ्या ट्रॅफिकवर अवलंबून असलेल्या हजारो साईट्स सध्या भारतात आहेत. त्या सर्वच या बदलांमुळे बंद पडण्याच्या मार्गावर जाणार आहेत. पत्रकार म्हणून आपण यातून काय समजून घेतले पाहिजे.
१ महत्त्वाचे म्हणजे जे पत्रकार डिजिटल माध्यमात सध्या संपादकीय विभागात काम करता आहेत. त्यांनी तातडीने पर्यायी व्यवस्था किंवा व्यवसाय शोधला पाहिजे. येत्या वर्षभरात या सगळ्या बदलांचे साईड इफेक्टस दिसायला लागतील. त्यातून पहिला घाव हा संपादकीय विभागावरच पडणार हे निश्चित. संपादकीय विभागातील मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात कमी केले जाईल. कारण ट्रॅफिक नाही म्हणजे बिझनेस नाही आणि बिझनेस नाही म्हणजे कॉस्ट कटिंग हे ठरलेले दुष्टचक्र आहे. दुसरे म्हणजे इन्स्टंट आर्टिकल बंद होणार याचा अर्थ लिंकचे डिस्ट्रिब्युशनही फेसबुक कमी करणार. त्यामुळे फेसबुकवर लिंक्स शेअर करून त्यातून खूप काही हातात येईल, असे मुळीच नाही. केवळ क्लीकबेट हेडिंग करण्यात माहीर असलेल्यांसाठी आता बुरे दिन येणार हे तर निश्चित.
२ सोशल मीडियातून येणारे ट्रॅफिक कमी होत गेल्यावर अर्थातच गुगल किंवा सर्च इंजिनकडून मिळणारे ट्रॅफिक यावर लक्ष केंद्रित होणार आहे. पण चॅट जीपीटीसारख्या नव्या प्रॉडक्टमुळे सर्च इंजिनपुढेच आव्हान उभे राहिले आहे. माहिती मिळवण्यासाठी युजर आर्टिफिशिअल इंटेलिजन्स बॉट्सचा वापर हळूहळू करू लागणार. एकाच ठिकाणी आवश्यक माहिती मिळू लागल्यावर ही साईट बघ, ती साईट बघ हे प्रकार आपोआप कमी होणार. महत्त्वाचे म्हणजे रेफरन्ससाठी आतापर्यंत न्यूज वेबसाईट प्रामुख्याने बघितल्या जायच्या. पण आता चॅट जीपीटीमुळे हे कमी होत जाणार. याचा फटका ऑरगॅनिक ट्रॅफिक किंवा गुगलकडून मिळणाऱ्या ट्रॅफिकवरही होणारच.
३. सब्सक्रिप्शन मॉडेल भारतात यशस्वी झालेले नाही. मुळात फुकटच इतका कंटेट मिळतो आहे. मग तो वाचण्यासाठी पैसे कशाला द्या, अशी भारतीय लोकांची मानसिकता झाली आहे. सध्या ट्रेंड असा आहे की लोकांनी जरी महिन्याचे किंवा दोन महिन्यांचे सब्सक्रिप्शन घेतले तरी ते कंटिन्यू करत नाहीत. त्यामुळे सब्सक्रिप्शन मॉडेलमध्ये सब्सक्रायबर ड्रॉप होण्याचे प्रमाण खूप आहे. त्यामुळे तो पर्याय नाही हे माध्यम कंपन्यांना कळले आहे.
४ भाषांतर करणारे अनेक टूल्स मोफत उपलब्ध आहेत. ते वापरायलाही सुरुवात झाली आहे. या टूल्समध्ये सातत्याने सुधारणाही होत आहेत. विशेषतः भारतीय भाषांमधील भाषांतर बऱ्यापैकी नेमके आहे. त्यामुळे हिंदीतून इतर प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतर करण्यासाठी या टूल्सचा वापर मोठ्या प्रमाणात होतो आहे. येत्या काळात केवळ भाषांतरासाठी कुशल मनुष्यबळ लागणार नाही. त्यामुळे संपादकीय विभागातील अशा मनुष्यबळाला घरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.
५ ॲग्रिगेटर्सच्या माध्यमातून ट्रॅफिक येत असले तरी त्यातून पदरात काहीच पडत नाही. नुसतेच आकडे मोठे दिसतात पण जाहिरातदाराकडे गेले की तो उभंही करत नाही. त्यामुळे त्याचाही काहीच उपयोग नाही.
अशी सगळी परिस्थिती असताना येत्या वर्ष ते दोन वर्षात डिजिटल माध्यमांमध्ये खूप बदल झालेले दिसतील. हे बदल पत्रकारांसाठी फारसे आशादायक नक्कीच नाही. त्यातही वर्षांनुवर्षे एकाच पद्धतीचे काम करत असलेल्या पत्रकारांसाठी हा फटका जास्त तीव्र असणार, हे नक्की.
– विश्वनाथ गरुड
पुणे