इजा बिजा झाला, आता तिजा दाखवायची वेळ आली

0
494

चिंचवड, दि.१३ (पीसीबी) – बाळासाहेब ठाकरे असतानाही शिवसेनेत दोनदा बंड झाले. मात्र, त्याही निवडणुकीत बंडखोरी करणारे पडले. इजा बिजा झाली. आता तिजा दाखवायची वेळ आली आहे, असा इशारा त्यांनी नाव न घेता शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांना दिला आहे. ते चिंचवड येथील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे व महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रचारार्थ झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते.

अजित पवार म्हणाले की, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना काढली. मराठी माणसांना आधार द्यायला, त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून पक्ष काढला. शिवसेना कानाकोपऱ्यापर्यंत पोचवली. त्यांच्याही काळात दोनदा बंड झाले. त्याही निवडणुकीत बंडखोर करणारे पडले. इजा बिजा झाली. आता तिजा दाखवायची वेळ आली आहे.

दादा पुढे बोलताना म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनीच उद्धव ठाकरे यांना शिवसेनाप्रमुख केले. आदित्य ठाकरेंना युवा नेतृत्व म्हणून पुढे आणले. मग इतरांना आक्षेप कसला, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला.

अजित पवार म्हणाले की, आमचे सरकार आले. कामाला सुरुवात झाली. दुर्दैवाने तीन महिन्यांनी करोना आला. मित्रांनो महाराष्ट्राच्या कामाची दखल न्यायव्यवस्थेने घेतली. निर्णय घ्यायला बंदी होती. मात्र, व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून डॉक्टरची टीम, आरोग्य मंत्र्यांशी बोलत होतो. आढावा घेत होतो. जंबो हॉस्पिटल तयार केले. या सगळ्या काळामध्ये कुठेही आर्थिक बातमीत अडचणी येऊ दिल्या नाहीत.

अजित पवार म्हणाले की, बेडूक फुगतो. मात्र, त्याची मर्यादा असते. बंडखोराचा बोलविता धनी वेगळाच आहे. काहींना वाटते फॉर्म राहिल्यानंतर सोपे जाईल. मात्र तसे होणार नाही. आमदारांचे निधन झाले याचा मुद्दा भावनिक करायची गरज नाही. भाजपने एवढा स्वार्थीपणा केला की, मुक्ताताई टिळक, लक्ष्मण जगताप गंभीर आजारी होते. मात्र, त्यांना अॅम्ब्युलन्स करून मतदानाला नेले. एक-दोन मते कमी पडली असती, तर काय झालं असतं? निवडणुकीपेक्षा तुमचा जीव महत्त्वाचा, आरोग्य महत्त्वाचे हे सांगितले असते, तर काय बिघडले असते, असा सवाल करत त्यांनी भारतीय जनता पक्षालाही खडे बोल सुनावले