चंद्रशेखर बावनकुळे आता तीन वर्षासाठी प्रदेशाध्यक्ष

0
403

नाशिक, दि. १० (पीसीबी) : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारीणीची बैठक आजपासून येथे होत आहे. प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर ही बैठक असल्याने त्यात उद्या (ता.11) चंद्रशेखर बावनकुळे यांना तीन वर्षासाठी नियुक्तीवर शिक्कामोर्तब होईल. त्यानंतर संघटनात्मक निवडणुकांची प्रक्रीया गतीमान होईल. त्यामुळे बावनकुळेंच्या दृष्टीने या अधिवेशनाला महत्त्व आहे. आगामी महापालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका तसेच लोकसभा आणि विधानसभा निवढणुकांच्या दृष्टीने ही नियुक्ती अत्यंत महत्वाची समजली जाते.

प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर होणारी ही पहिली प्रदेश कार्यकारीणीची बैठक आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार पायउतार होऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर होणारे देखील ही पहिलीच बैठक आहे. त्यामुळे राजकीय व संघटनात्मकदृष्ट्या या बैठकीला विशेष महत्व आहे.
आगामी काळात पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका व नियुक्त्यांची प्रक्रीया सुरु होईल. त्यात शहर व जिल्ह्यांसह विविध आघाड्यांतील पदाधिकाऱ्यांची नव्याने नियुक्ती होईल. त्यामुळे राज्यभरातून पदाधिकारी व निमंत्रीत या बैटकीला हजेरी लावणार आहेत. आज सायंकाळी महत्त्वाच्या नेत्यांची आढावा बैठक होईल. त्यात उद्याच्या बैठकीची कार्यक्रमपत्रीका ठरेल. यामध्ये प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती तीन वर्षांसाठी करण्याचा ठराव संमत होण्याची शक्यता आहे.

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडल्यानंतर त्या बैठकीच्या विचारातून बाहेर पडलेले मंथन राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्या बरोबरचं आगामी निवडणुकांसाठी व्यूहरचना आखण्यासाठी नाशिक मध्ये दोन दिवसीय प्रदेश कार्यकारिणीची बैठक होणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय संघटनमंत्री बी. एल. संतोष, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सातपूर येथील डेमॉक्रसी हॉटेल येथे बैठक होईल. भाजपचे केंद्रातील महाराष्ट्राचे मंत्री व राज्यातील मंत्री, खासदार, आमदार उपस्थित राहतील. यातील अनेक नेते शहरात दाखल झाले आहेत.