मोहन भागवत यांना ‘तसे’ म्हणायचे नव्हते …

0
215

नागपूर, दि. ८ (पीसीबी) – “पंडितांनी आपल्या स्वार्थासाठी समाजात उच्चनीचता निर्माण केली. भगवद्गीता व अन्य धर्मग्रथांनी समाजाला सत्य सांगितले. पण, आपण भेदाभेद निर्माण करून सत्याचे अनुसंधान केलं नाही. समाज विखुरला गेल्याने परकीय आक्रमकांनी त्याचा लाभ घेतला.”, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी मुंबईत केले. उत्तर भारतात सध्या रामचरितमानस ग्रंथावरुन वाद सुरु आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर मोहन भागवत यांनी हे वक्तव्य केल्यानंतर विरोधकांना संघ आणि भाजपावर टीका करण्याची आयती संधी मिळाली. या टीकेनंतर राष्ट्रीय स्वयंसवेक संघाने सारवासारव केली असून मोहन भागवत यांना ‘तसे’ म्हणायचे नव्हते, असे स्पष्टीकरण दिले आहे.

रामचरितमानस ग्रंथावरुन उत्तरेत बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये बराच गजहब सुरु आहे. बिहारमधील आरजेडी पक्षाचे नेते आणि शिक्षण मंत्री चंद्रशेखर यांनी या वादाची सुरुवात केली. त्यानंतर त्याचे लोन उत्तर प्रदेशमध्येही पसरले. युपीमधील समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी सांगितले की, रामचरितमानसच्या प्रती जाळून टाकू. भाजपाने यावर रान पेटवलेले असतानाच मोहन भागवत यांचे रविवारी वक्तव्य आले आणि विरोधकांनी ब्राह्मण समाजावर टीका केली. ब्राह्मण समाजाने जातीयव्यवस्थेच्या माध्यमातून इतर समाजावर अत्याचार केले, असा आरोप विरोधकांनी केला.

काय म्हणाले मोहन भागवत?
मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात रोहिदास समाज पंचायत संघ आणि वसुधा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंतीनिमित्त रविवारी (५ फेब्रुवारी) कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हा सरसंघचालक मोहन भागवत बोलत होते. ते म्हणाले, “संतानी सत्यात देवाचे रुप पाहिले. देव सर्वांमध्ये आहे. नाव किंवा रंग काहीही असो, सर्वांमध्ये समान क्षमता आणि आदर आहे. सर्व माझेच आहेत. कुणीच श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही. तसेच शास्त्रांच्या आधारे पंडिताने असत्य सांगितले असे दिसते. जातीच्या भींतीत अडकून आपण आपला मार्ग चुकलो आहोत. हा भ्रम दूर व्हायला हवा.”

भागवत यांच्या वक्तव्यानंतर संघाची सारवासारव
मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा विरोधकांनी वेगळा अर्थ काढल्यानंतर संघाचे प्रसिद्धी विभागाचे प्रभारी सुनील आंबेकर यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले, “संत रविदास जयंतीच्या कार्यक्रमा ते मराठीत बोलत होते. मराठीत पंडित म्हणजे बुद्धिवादी व्यक्ती होय. त्यांचे विधान हे योग्य दृष्टीकोनातून घेतले गेले पाहीजे.” तसेच सरसंघचालक हे नेहमीच सामाजिक समरसतेबाबत बोलत असतात. त्यांचे म्हणणे होते की, प्रत्येकजण धर्मग्रंथातील शास्त्राचा आपापल्यापरिने अर्थ काढतो, ते काही ठिक नाही. तसेच त्यांनी संत रविदासांचा अनुभव सांगत होते. सामाजिक सलोखा बिघडेल असे कुणीही वक्तव्ये करु नयेत. संघाने नेहमीच अस्पृश्यतेच्या विरोधात भूमिका घेतली असून सामाजिक विभाजनाचा निषेध केला आहे, असेही आंबेकर यांनी स्पष्ट केले.