कसब्यात मनसेचे `इंजिन` चालणार ?

0
218

पुणे, दि. ४ (पीसीबी)  : ‘कसबापेठ विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्या आधारे या निवडणुकीत मनसे चमत्कार घडवू शकते. त्यामुळे ही निवडणूक लढवावी,’ अशी गळ शहर मनसेतर्फे पक्षाचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांना घालण्यात येणार आहे. तसा संकल्पच मनसेतर्फे शुक्रवारी घेण्यात आलेल्या मेळाव्यात करण्यात आला.

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेतर्फे संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पक्षाचे नेते अनिल शिदोरे व राजेंद्र वागस्कर, शहराध्यक्ष साईनाथ बाबर, सरचिटणीस अजय शिंदे, बाळा शेडगे, अॅड. गणेश सातपुते, प्रवक्ते अॅड. योगेश खैरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. ‘कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात मनसेची मोठी ताकद आहे. त्यामुळे निवडणूक लढवावी, यासाठी कार्यकर्ते आग्रही आहेत. त्याविषयी संकल्प मेळाव्यात चर्चा झाली. ही भूमिका पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचवली जाईल,’ असे बाबर यांनी सांगितले.

आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये कसबा परिसरात मनसेची ताकद दिसून आली आहे. या भागात कार्यकर्त्यांचा चांगले काम व संपर्क असल्याने ही निवडणूक लढवावी, यासाठी आग्रह आहे. पक्षाचे नेते ही भूमिका राज ठाकरेंपर्यंत पोहोचवतील, असे खैरे यांनी सांगितले. राज ठाकरे रविवारी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी ‘कसब्या’बाबतचा निर्णय अंतिम होईल. राज ठाकरे घेतील, तो निर्णय आम्हाला मान्य असेल, असे वागस्कर यांनी सांगितले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे कसबा विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी आठ-दहा कार्यकर्ते इच्छुक आहेत. त्यांच्याकडून पक्षाकडे अर्जही करण्यात आल्याचे समजते. यामध्ये गणेश भोकरे, आशिष देवधर, अॅड. गणेश सातपुते, अजय शिंदे, नीलेश हांडे या प्रमुख नावांसह जयश्री पाथरकर, सुशीला नेटके आणि माई तळेकर या महिला पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या नावांचाही समावेश आहे.