भाजपमध्ये उमेदवारीचा मोठा घोळ, आश्विनीताई की शंकरशेठ काही ठरेना

0
419

-अश्विनी जगताप आणि शंकर जगताप दोघांची नावे ही उमेदवारीच्या शर्यतीत. पिंपरी-चिंचवड शहरात राजकिय घडामोडींना वेग…

चिंचवड, दि. २ (पीसीबी) – – दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांच्या पाठोपाठ आमदारांचे बंधू शंकर जगताप यांनी देखील उमेदवारी अर्ज घेतला आहे. दोघांची नावे ही उमेदवारीच्या शर्यतीत आहेत. अश्विनी जगताप आणि शंकर जगताप पैकी एकाला भाजपाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, दोघांनी उमेदवारी अर्ज विकत घेतल्याने भाजपा पक्षश्रेष्ठी कोणाला एबी फॉर्म देणार हे देखील तितकंच महत्वाचे आहे. तसेच, २०१९ मध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार राहुल कलाटे यांनी देखील अर्ज घेतला आहे. पक्ष विरहित अर्ज घेतल्याचे त्यांनी सांगितले आहे.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक संदर्भात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबातील बंधू शंकर जगताप आणि दिवंगत आमदारांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आले होते. जगताप कुटुंबासोबत त्यांनी बंद दाराआड चर्चा देखील केली होती. परंतु, ती चर्चा राजकीय नव्हती, कौटुंबिक भेट देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याचे शंकर जगताप यांनी सांगितले होते. भाजपाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता असलेल्या अश्विनी जगताप आणि शंकर जगताप यांनी उमेदवारी अर्ज आणल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे. तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.भाजपा पक्षश्रेष्ठी याकडे कसे पहाते आणि कोणाला एबी फॉर्म देऊन अधिकृत उमेदवार करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. अद्याप महाविकास आघाडीचे चित्र अस्पष्ट आहे.