महापालिका आयुक्त शेखर सिंह तोंडघशी; आयुक्तांना अतिघाई नडणार?
पिंपरी, दि. 24 (पीसीबी) – स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत तयार केलेल्या केबल इन्टरनेट नेटवर्कचे काम घेण्यासाठी मे. सुयोग टेलीमॅटिक्स व मे. फायबर स्टोरी कम्युनिकेशन्स प्रा. ली. या भागीदार कंपनीने निविदा प्रक्रियेसाठी महापालिकेला सादर केलेले टाटा टेलिसर्विसेसचा अनुभवाचा दाखला बोगस असल्याचे उजेडात आले आहे. फसवणूक करण्यात तरबेज असलेल्या आणि निर्ढावलेल्या कंपनीला पाठीशी घालत कामाचा आदेश दिल्यामुळे महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह हे तोंडघशी पडले आहेत. अत्यंत बेजबाबदारपणे ही निविदा प्रक्रिया हाताळल्यामुळे महापालिका प्रशासनाही संशयाच्या भोवऱ्यात सापडले असून या कंपनीवर आयुक्तांनी तात्काळ फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी माजी नगरसेविका सीमा सावळे यांनी केली आहे.
याबाबत महापालिका आयुक्तांना सीमा सावळे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुमारे सहाशे किलोमिटर लांबीचे अंडरग्राऊंड केबल इंटरनेट डक्ट तयार करण्यात आले आहेत. हे नेटवर्क भाडेतत्वावर देण्यासाठी महापालिकेने सुमारे 300 कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध केली होती. या निविदेमध्ये मे. सुयोग टेलीमॅटिक्स व मे. फायबर स्टोरी कम्युनिकेशन्स प्रा. ली. या भागीदार कंपनीने सहभाग नोंदविला होता. निविदा प्रक्रियेतील अटी व शर्तीनुसार कंपनीकडे अनुभव असणे आवश्यक होते. मात्र या दोन्ही कंपन्यांकडे अनुभव नसतानाही या कंपन्यांनी टाटा टेलिसर्विसेस लिमिटेड या कंपनीचे काम केल्याचा अनुभवाचा दाखला जोडला आहे.
निविदे प्रक्रीयेमध्ये मोठी अनागोंदी असल्याबतच्या तक्रारी झाल्या होत्या परंतु त्याकडे दूर्लक्ष करत महापालिका आयुक्त आणि प्रशासनाने ही निविदा रेटण्याचा प्रयत्न केला.
अत्यंत दुर्देवी बाब म्हणजे महापालिका आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या शेखर सिंह यांनी कंपनीला आणि त्यांच्या कृत्याला पाठीशी घालत त्यांना कामाचे आदेशही दिले आहेत. आम्ही वारंवार कंपनीने सादर केलेल्या बोगस कागदपत्रांवर आक्षेप नोंदविल्यानंतरही त्याची शहानिशा करण्यात आली नाही. या कंपनीने टाटा कंपनीचा जो अनुभवाचा दाखला जोडला आहे तो बोगस असल्याची बाब आता उजेडात आली असून टाटा कंपनीने महापालिकेला तसे लेखी पत्र देत कळविले आहे.
आम्ही स्वत: टाटा कंपनीसोबत केलेल्या पत्रव्यवहारामुळे हा प्रकार उजेडात आला आहे. बोगस आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कंपनीला इंटरनेट नेटवर्कचे काम देऊन महापालिका आयुक्त आणि स्मार्ट सिटीचे प्रशासन शहरवासियांच्या भावनांशी खेळत असल्याचा आरोपही सावळे यांनी केला आहे. या निवेदनाच्या प्रती आणि टाटा कंपनीने दिलेल्या पत्राची प्रत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.
तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करा
मे. सुयोग टेलीमॅटिक्स व मे. फायबर स्टोरी कम्युनिकेशन्स प्रा. ली. या भागीदार कंपनीने सादर केलेला अनुभवाचा दाखला बोगस असल्याचे समोर आले असून तसे पत्रच टाटा कंपनीने महापालिकेला दिले आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी संबंधित कंपन्यांच्या संचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत तसेच या कंपन्यांना काळ्यात यादीत टाकावे. या कंपनीला पाठीशी घालून या प्रकारात भ्रष्टाचार करण्याच्या उद्देशाने ज्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा व सल्लागारांचा समावेश आहे त्यांनाही तात्काळ निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी करावी, अशी मागणीही सिमा सावळे यांनी केली आहे. भ्रष्टाचाराने बरबटलेल्या अधिकाऱ्यांच्या फायद्यासाठी सुरू असलेला हा प्रकार कोणाच्या दबावाखाली सुरू आहे ते देखील आयुक्तांनी जाहीर करावे, आयुक्तांनी यातून तरी शहाणपण घेऊन योग्य कारवाई करावी, अन्यथा शहरात जनआंदोलन उभे करून न्यायालयात दाद मागितली जाईल, असा इशाराही सावळे यांनी दिला आहे.