पुणे : पुण्याचे मनसे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्यावर दोन गुंडांनी राजगुरुनगरच्या सातकरस्थळ येथील राहत्या घरासमोर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबारामुळे राजगुरुनगर परिसरात दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. तर याप्रकरणी राजगुरुनगर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिलिंद जगदाळे आणि मयुर जगदाळे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मी खेडचा भाई आहे. एकाला घालवलाय. तुलाही माज आलाय संपवतोच तुला, असे म्हणत गुंडांनी पिस्तुल रोखून समीर थिगळे यांच्याकडे पैशाची मागणी केली. त्यानंतर या गुंडांनी फारिंग केली. गुंडांनी समीर थिगळे यांच्या छातीवर गोळी झाडली. पण सुदैवाने पिस्तुलातून गोळी सुटली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. त्यानंतर या गुंडांना हवेत गोळीबार करून थिगळे यांना धमकावून घटनास्थळावरून पळ काढला.
थिगळे यांच्या कुटुंबीयांसमोरच हा धक्कादायक प्रकार घडला. त्यामुळे थिगळे कुटुंबीय हादरून गेले आहेत. या हल्ल्यात कुणालाही इजा झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र राजगुरुनगर परिसरात दहशतीचे वातावरण तयार झाले आहे.
दरम्यान, खूनाच्या गुन्ह्यात जामिनावर असलेल्या आरोपींकडून खंडणीची मागणी करत हा गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे. तसेच गोळीबार करणाऱ्या आरोपीवर मोक्का आणि खुनासारख्या गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. आरोपी सध्या जामिनावर बाहेर आले आहेत. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
याप्रकरणी राजगुरुनगर पोलिसांत मिलिंद जगदाळे आणि मयूर जगदाळे यांच्या विरोधात प्राणघातक हल्ला करत शस्त्राचा वापर करून खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार झाले असून राजगुरू नगर पोलीस या गुंडांचा शोध घेत आहेत.