सांगली, दि. २१ (पीसीबी) : राजकीय विरोधक म्हणजे कुणी दुष्मन नव्हे. एकमेकावर राजकीय टीकात्मक बोलले तरी विकास कामाबाबत चर्चा, संवाद होतच असतो, असे सांगत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पार्थ पवार आणि शंभूराज देसाई यांच्या भेटीचे अप्रत्यक्ष समर्थन केले.
विधानसभेतील विरोधी पक्ष नेते पवार यांनी अंजनी (ता. तासगाव) येथील स्व. आर. आर. आबा पाटील यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. या वेळी पार्थ आणि मंत्री देसाई यांच्या भेटीबाबत विचारणा केली असता थेट उत्तर न देता पवार यांनी ‘मी मंत्री असताना अनेक राजकीय नेते भेटत होते. अशा अनौपचारिक बैठकीमध्ये विकास कामाबाबत चर्चाही केली जाते. आमचे पक्ष निराळे आहे म्हणजे राजकीय दुष्मनी नाही. सत्ताधारी, विरोधक म्हणजे आम्ही काही शत्रू नाही, हे समजून घ्यावे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार एकमेकाबद्दल टीकात्मक भाषण करायचे, पण एकत्र भेटल्यावर मैत्रीपूर्ण बोलायचे आणि हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे.’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये झालेला कार्यक्रम हा मुंबई महापालिका निवडणूक नजरेसमोर ठेवून झाला असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले जात आहे असेही त्यांनी या वेळी सांगितले. या वेळी आबांच्या स्मृतिस्थळी संरक्षण भिंत उभारण्यात आली असून या ठिकाणी झाडे लावण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.