स्वच्छतेबाबत सूक्ष्म नियोजन

0
373

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – स्वच्छ सर्वेक्षण 2023 या स्पर्धेत शहराचा पहिल्या दहामध्ये क्रमांक आणण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. यासाठी स्वच्छतेचे विविध उपक्रम, स्पर्धा, कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचबरोबर घरोघरचा कचरा उचलण्यासाठी घंटागाड्या वेळेवर जातात की नाही यावर कमांड कंट्रोल सेंटरमधून नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.

सध्या दररोज बाराशे टन कचरा निर्माण होत आहे. गतवर्षी विविध उपक्रम राबवूनही शहराचा स्वच्छतेमध्ये 19 वा क्रमांक कायम होता. त्यामुळे महापालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून ओला व सुका कचरा वर्गीकरणासाठी जनजागृती, आरोग्य कर्मचाऱ्यांची क्षमता बांधणी, शहरातील सर्व शाळा झिरो वेस्ट, स्वच्छ वार्ड स्पर्धा, कचरा कुंडीमुक्त शहर, कचरा मुक्त झोपडपट्टी यासह विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. तसेच शहरातील ज्या भागातील मोकळ्या जागेत कचरा टाकला जातो, त्या जागेचे सौंदरीकरण, रांगोळी काढून स्वच्छतेबाबतचा संदेश देण्यात येत आहे.

शहरातील कचरा संकलनासाठी सध्या 444 घंटागाड्या आहेत. या घंटागाड्यांच्या मार्फत ओला व सुका कचऱ्याचे संकलन करण्यात येत आहे. मात्र, एखाद्या भागात घंटागाडी येत नसल्याच्या पूर्वी तक्रारी येत होत्या. याची दखल घेऊन पालिकेने सर्व घंटागाड्यांवर जीपीएस सिस्टीम बसविली आहे. या गाड्यांवर निगडीतील कमांड कंट्रोल सेंटरमधून नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे एखाद्या भागात गाडी गेली की नाही किंवा वेळेवर गेली का? गेली नसेल तर का गेली नाही? याची सर्व माहिती डॅशबोर्डेवरून संबंधित ठेकेदार, पालिकेच्या अधिकाऱ्यांना नोटीफिकेशनव्दारे मिळणार आहे. या यंत्रणेच्या मार्फत गाड्यांवर लक्ष ठेवण्यास सुरूवात केली आहे. तसेच महिन्यात घंटागाड्याच्या किती फेऱ्या झाल्या यावरूनच संबंधित ठेकेदाराला वेतनही अदा केले जाणार आहे.