केबल नेटवर्क प्रकरण – नामदेव ढाके अज्ञानी, त्यांनाही तोंड लपवायची वेळ येईल

0
273

– राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाना काटे यांची परखड टीका

– हे प्रकरण शिंदे-फडणवीस यांच्याच काळातले

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – हिंदुत्वाचा बुरखा पांघरून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार कऱणाऱ्यांनी दुसरीकडे दुबई, पाकिस्तानातील गुन्हेगरांशी संबंधीत कपंनीकडे पिंपरी चिंचवड शहरातील इंटरनेट केबल नेटवर्क सोपविण्यासाठी आटापीटा केला. पुरावे मिळताच सत्ताधारी दुटप्पी, भ्रष्ट, भंपक भाजप नेत्यांचा हा बुरखा राष्ट्रवादी काँग्रेसने टराटरा फाडल्यानेच आता भाजप नेत्यांची अक्षरशः तंतरली आहे. या प्रकरणात महापालिका निवडणुकित हात पाय भाजणार आणि तोंडही पोळणार असे दिसताच भाजपचे माजी सत्ताधारी नेते नामदेव ढाके यांचे बाहुले पुढे करून `मी नाही त्यातली…` अशा थाटात आव आणत उलटपक्षी राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप करणाऱ्यांची अवस्था केविलवाणी आहे. ढाके यांचे या प्रकरणातील अज्ञान त्यात दिसले असून माजी सत्ताधारी नेते एकनाथ पवार यांच्या पाठोपाठ त्यांच्यावरही तोंड लपवायची पाळी येईल, अशी परखड टीका महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी प्रसिध्दीपत्रातून केली आहे.

स्मार्ट सिटी प्रशासनाच्या माध्यमातून शहरात इंटरनेट नेटवर्किंगसाठी तयार केलेले अंडरग्राउंड डक्ट भाड्याने देण्याच्या कामात दुबई, पाकिस्तानातील गुन्हेगारांशी संबंधीत कंपनीकडे काम सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय शहरासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतो, महिला मुलिंची सुरक्षा संकटात येऊ शकते, डेटा चोरी, सायबर हल्ले होऊ शकतात असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी निदर्शनास आणले होते. हा निर्णय तत्काळ रद्द करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी महापालिका आयुक्त आयुक्त यांना भेटून दिला होता. चहुबाजुंनी त्याबाबत भाजपवर टीका होऊ लागल्याने सोमवारी (दि.२६) भाजपचे ढाके यांनी प्रसिध्दीपत्र काढून राष्ट्रवादी काँग्रेसवर `चोराच्या उलट्या बोंबा`, या कामात राष्ट्रवादीचाच छुपा हात आहे असे आरोप केले होते. त्यावर प्रसिध्दीपत्र काठून नाना काटे यांनी भाजपला चोख उत्तर दिले.

नाना काटे आपल्या प्रसिध्दीपत्रकात म्हणतात,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर टीका करणाऱ्या नामदेव ढाके यांचे पूरते अज्ञान दिसले. शहरासाठी काय धोका संभवतो ते सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसने प्रशासनाला सांगितले. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळीशी संबंधीत कंपनीचे भागधारकांकडे शहराचा कडेलोट करणार, असे राष्ट्रवादीने म्हटले होते. त्यासाठी मोठ्या आंदोलनाची तयारी तसेच जनजागृती मोहीमही सुरू केली होती. इतकेच नाही तर ही निविदा रद्द करण्याची आग्रही मागणी प्रथम राष्ट्रवादीने केली. उलटपक्षी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे कार्याध्यक्ष शेखर सिंह यांच्याकडे विषय मंजुरीसाठी तगादा लावला होता. आता भाजपची अवस्था `चोर तर चोर वर शिरजोर`, अशी आहे.

श्री. नामदेव ढाके यांचा बोलविता धनी कोणी वेगळाच आहे. ढाके हे निव्वळ बोलके बाहुले आहे. आज त्यांचा वापर केला जातोय. उद्याच्याला त्यांची स्थिती `घर का ना घाटका` अशी होणार आहे. राष्ट्रवादीवर आरोप करणाऱ्या श्री. ढाके यांनी अगोदर या विषयाचा थोडासा गृहपाठ केला असता तर बरे झाले असते. ढाके यांचा अज्ञानीपणा उघड झाला आहे. कारण ढाके यांनी त्यांच्या निवेदनात, २५ जून २०२१ रोजी स्मार्ट सिटीच्या १४ संचालक मंडळाच्या बैठकीत या विषयाला मंजुरी देण्यात आली. तसेच, सीईओंच्या उपस्थितीत दि. १७ मे २०२१ रोजी केबल नेटवर्कच्या कामाकरिता खर्चाबाबत चर्चा करण्यात आली, असे म्हटले आहे. मुळात महापालिकेत सत्ता भाजपचीच होती आणि स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळातील १४ पैकी महापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि खुद्द गटनेते म्हणून ढाके हे संचालक होते. त्यावेळी ढाके आणि भाजपचे नेते झोपेत होते का ? विषयाबाबत अज्ञान होते का ? की भ्रष्टाचारामुळे डोळ्यावरझापड ओढले होते ?
श्री. नामदेव ढाके म्हणतात, ३० जून २०२२ रोजी निर्णय घेण्यात आला. निविदाबाबत अटी-शर्ती ठरविल्या त्याला दि. ५ जुलै २०२२ रोजी मान्यता दिली आहे. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाली आहे. अहो अज्ञानी ढाके महोदय, भाजपच्या खोके राजकारणामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी २९ जूनला स्वतःहून राजीनामा दिला आणि ३० जूनला एकनाथ शिंदे यांच्या ईडी सरकारचा शपथविधी झाला. बरे, या विषयाला ५ जुलैला मान्यता दिली असे ढाके म्हणतात, पण त्याकाळात ही मान्यता देणारेसुध्दा शिंदे-फडणवीस यांचेच सरकार होते. महाआघाडी सरकराच्या काळातील नाही तर, शिंदे – फडणवीस यांच्या काळातील हे प्रकरण आहे.

अहो ढाके महोदय, या विषयाला पहिला विरोध राष्ट्रवादी काँग्रेसने केला. २२ डिसेंबर २०२२ रोजी त्याबाबतचे निवेदन आयुक्तांना दिले. त्यानंतर आता कुठे भाजपला जाग आली. आताच्या घडीला महापालिकेत प्रशासकसुध्दा भाजप नेत्यांच्या सांगण्यानुसार बसविण्यात आलेत. राज्यातील सरकार तुमचेच आहे आणि महापालिका आयुक्तसुध्दा भाजपचे एकनारेच आहेत. आशा परिस्थितीत उगाच कांगावा करून आम्ही किती साजूक आहोत, हे दाखविण्याचे नाटक करण्यापेक्षा आयुक्तांना सांगून निविदा रद्द करा. महापालिका निवडणुकीत लोक तुमचे गाल लाल करणार असे दिसले म्हणून तुम्हाला उपरती झाली आणि आता तुम्हीच निविदा रद्द करण्याची मागणी करतात. हा ढोंगीपणा फक्त भाजपलाच जमतो. प्रकरण महागात पडणार म्हणून तुमची तंतरली. तुमचा बुरखा फाटला आहे. भ्रष्टाचाराच्या नादात तुम्ही देशविघातक शक्तींशी हातमिळवणी करायला गेलात आणि उघडे पडलात, अशी रोखठोक टीका नाना काटे यांनी केली आहे.

यापूर्वी भामा आसखेड जॅकवेल प्रकरणात भाजपच्या नेत्याचा ३० कोटींचा झोल असल्याचे राष्ट्रवादीने उघड केले आणि भ्रष्टाचाराचा भंडाफोड केला होता. त्यावेळी भाजपचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार यांनी असा कुठलाही भ्रष्टाचार झाला असेल तर मी राजकीय सन्यास घेईन अशी राणा भीमदेवी थाटात घोषणा केली होती. त्याच दिवशी खुद्द भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी, याच प्रकरणात २० ते २५ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार असल्याचा आरोप करून एकनाथ पवार यांना तोंडघशी पाडले. तेव्हापासून एकनाथ पवार हे तोंड लपवत आहेत. आता नामदेव ढाके यांच्यावरही तीच वेळ येणार आहे, असे नाना काटे यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.