पिंपरी, दि. २४ (पीसीबी) : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उपायुक्त स्मिता झगडे यांनी नियमबाहय कामकाज करून प्रशासनाची फसवणूक केली आहे. महापालिका सेवेत रुजू झाल्यापासून त्यांच्या संपूर्ण कमकाजाची चौकशी करावी, अशी मागणी भाजपाच्या माजी नगरसेविका जयश्री गावडे यांनी केली आहे.
यासंदर्भात गावडे यांनी आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, स्मिता झगडे या पिंपरी-चिंचवड महापालिका सेवेत उपायुक्त पदवर कार्यरत आहेत. त्यांच्याबाबत वारंवार तक्रारी आल्या आहेत. त्यांनी नियमबाह्य कामे केली आहेत. त्यांनी आजपर्यंत विविध विभागात केलेल्या कामांमध्ये अनियमितता असून यामुळे महापालिकेचे प्रचंड नुकसान झाले आहे.
महापालिकेच्या कर संकलन विभागात कार्यरत असताना त्यांनी चुकीच्या नोंदी लावल्या आहेत. त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेत आजपर्यंत ज्या ज्या विभागाचा पदभार स्वीकारला आहे. तेथील त्यांच्या कामकाजाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेविका जयश्री गावडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.