पुणे, दि. २२ (पीसीबी) – भाजपच्या आमदार आणि पुणे शहराच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचं दीर्घ आजारानं गुरुवारी निधन झालं. गेल्याकाही महिन्यांपासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या, अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते, याच ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या सकाळी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेता येईल त्यानंतर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.
पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघाच्या त्या भाजपच्या विद्यमान आमदार होत्या. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या मुक्ता टिळक यांनी पुण्यात अनेक सामाजिक उपक्रम राबवले होते. काही दिवसांपूर्वी राज्यसभा निवडणुकीच्यावेळी त्यांना मतदानासाठी मुंबईत एअरअॅम्ब्युलन्सनं नेण्यात आलं होतं. मुक्ता टिळक यांनी सन २०१७ ते २०१९ या काळात शहराचे महापौरपद भूषवलं होतं