महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आता पुढच्या वर्षी

0
342

नवी दिल्ली, दि. ६ (पीसीबी) – शिवसेनेत फूट पडल्यापासून सुरू असलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सर्वोच्च न्यायालयात उद्या (ता. ७) होणारी प्रस्तावित सुनावणी आता पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. यानंतर पुढील सुनावणीच्या वेळापत्रकाबाबत १३ जानेवारी रोजी निर्णय घेतला जाईल असे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे आता ही सुनावणी पुढच्या वर्षावर गेली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घटनापीठापुढं सुरु असलेल्या या सुनावणीत पाचपैकी एक न्यायमूर्ती उद्या (ता. ७) उपलब्ध नसल्याने सुनावणी लांबणीवर पडली आहे.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील प्रकरण ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उद्या न्या कृष्ण मुरारी उपलब्ध होणार नसल्याने सुनावणी होऊ शकणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने नोटीसद्वारे स्पष्ट केले.

शिवसेना नेमकी कोणाची? या मुद्यावरून गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. अंधेरी पोटनिवडणुकीआधी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवून शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांना वेगळी नावे आणि चिन्हे दिली. तो निर्णय सर्वोच्च न्यायालयानेही योग्य ठरविला. त्यानंतर ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या गटाच्या १६ आमदारांना अपात्र ठरवण्यासंबधी याचिका दाखल केली होती. याच संदर्भात २९ नोंव्हेंबरला सुनावणी होणार होती. परंतु तेव्हाही ही सुनावणी लांबणीवर पडली होती. यावेळी ठाकरे गटाकडून वैधानिकदृष्या हे प्रकरण अत्यंत महत्त्वाचे असताना आणि महाराष्ट्रातील सरकारच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले असताना यावर तात्काळ सुनावणी घेण्याची मागणी केली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात पुढील सुनावणी 13 जानेवारीला होईल असे स्पष्ट केले आहे.

13 जानेवारीला मुख्य सुनावणीच्या वेळापत्रका संदर्भात निर्णय घेतला जाईल असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. त्यामुळं महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या मुख्य सुनावणीला कधी सुरुवात होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.