एकाच दिवशी चोरीच्या सहा गुन्ह्यांची नोंद सव्वा चार लाखांचा ऐवज लंपास.

0
358

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – शहरात चोरीच्या घटना ही नित्याची बाब झाली आहे. घरफोडी, जबरी चोरी, वाहन चोरी अशा घटनांना उत आला आहे. रविवारी शहर परिसरातील शिरगाव, हिंजवडी, दिघी, महाळूंगे, पिंपरी पोलीस ठाण्यात चोरीचे सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात चोरट्यांनी चार लाख २४ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे.

पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से टोल नाक्याजवळ कार पार्क करून पहाटेच्या वेळी झोपलेल्या चालकाच्या खिशातून पाच हजार रुपये रोख रक्कम आणि चार हजारांचा मोबाईल फोन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. ४) पहाटे साडेचार ते साडेपाच या कालावधीत घडली. शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी महेबुब अजमोदिन शेख (वय २६, रा. चिंचोली, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) यांनी फिर्याद दिली आहे.

बावधन मधील ऑक्सफर्ड हेलिपॅड या हॉल मध्ये चोरीची घटना घडली. मंडप डेकोरेशन करण्यासाठी गेलेल्या दोन कामगारांचे १२ हजारांचे दोन मोबाईल फोन आणि त्याच्या कव्हर मध्ये ठेवलेली २६ हजारांची रोकड असा ३८ हजारांचा ऐवज चोरट्याने चोरून नेला. आदिनाथ ज्ञानेश्वर मेंचकर (वय २१, रा. बावधन, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोबाईल फोन चार्जिंगला लाऊन डेकोरेशनचे काम करत असताना चोरट्याने संधी साधून चोरी केली.

व्यंकटराव नागनाथराव मेळगावे (वय ३२, रा. बुचडेवस्ती, मारुंजी) यांनी शनिवारी (दि. ३) रात्री लक्ष्मी चौकातील लक्ष्मी फर्निचरच्या दुकानासमोर त्यांची ३० हजारांची दुचाकी पार्क केली. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेली. हा प्रकार रविवारी सकाळी साडेअकरा वाजता उघडकीस आला. याप्रकरणी मेळगावे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

विष्णू गणपत कराड (वय ४६, रा. इंद्रायणीनगर, देहूफाटा. मूळ रा. लातूर) यांची २५ हजार रुपये किमतीची दुचाकी शनिवारी (दि. ३) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास अज्ञातांनी चोरून नेली. दुचाकी पार्क करून कराड हे कामासाठी गेले असता चोरट्यांनी दुचाकीचे लॉक तोडून ही चोरी केली. याप्रकरणी कराड यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

निघोजे येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीतून दोघांनी एक लाख ४७ हजार २८ रुपये किमतीच्या ४९ बॅटऱ्या चोरून नेल्या. याप्रकरणी महेंद्र ज्ञानदेव घोरपडे यांनी महाळुंगे चौकीत फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी विश्वनाथ भगवान कचरे (वय २६, रा. बुलढाणा), दीपक नाना सपकाळ (वय ३६, रा. जळगाव) या दोघांना अटक केली.

पिंपरी येथील गुरुनानक मार्केट मध्ये इलेक्ट्रिक पंप व केबलचे गोडाऊन फोडून चोरट्यांनी एक लाख ७४ हजार ९७५ रुपये किमतीचे इलेक्ट्रिक पंप आणि इलेक्ट्रिक केबल चोरून नेले. ही घटना रविवारी (दि. ४) पाहते साडेतीन वाजताच्या सुमारास घडली. गोडाऊनच्या शटर खालील सिमेंटच्या कठड्याला लावलेल्या विटा काढून शटर उचकटून चोरी केली. याप्रकरणी रमेश लक्ष्मणदास जेठवानी (वय ५८, रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.