पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘अ’ प्रभाग कार्यालयाकडून पिंपरी चौक, शगुन चौक, महाबली चौक, शनी मंदिर अशा विविध ठिकाणी चुकीच्या पद्धतीने अन्यायकारक कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप करत महाबली चौकामध्ये अनेक वर्षांपासून विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचे साहित्य जप्त केल्याच्या निषेधार्थ व रोजगाराच्या हक्कासाठी फेरीवाल्यांनी ‘अ’ प्रभाग कार्यालयासमोर आज बेमुदत आंदोलन करण्यात आले.
नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र होकर फेडरेशन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या वतीने हे आंदोलन सुरू करण्यात आले. कामगार नेते काशिनाथ नखाते, महासंघाचे कार्याध्यक्ष राजू बिराजदार, कार्याध्यक्ष इरफान चौधरी, संघटक अनिल बारवकर,किरण साडेकर ,विठ्ठल कड, बालाजी लोखंडे,परमेश्वर, सुशेन खरात, प्रदीप कोंगले, सुनंदा चिखले, अनिता वाघ, रेखा लागस,कमल नवगिरे,मनीषा गालफाडे,पूनम बनसोडे, अनिता बोरसे,करण भोसले,पिंटू डोहाळे, अक्षय नवगिरे, अप्पासाहेब जयगुडे, दिनेश भोसले,सुरेश नवगिरे ,प्रदीप मुंडे, अनिल मंदीलकर यांच्यासह अनेक विक्रेते व पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी नखाते म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारचा अपघात घडला की त्यांचे खापर फेरीवाल्यांवरती फोडले जाते. हे अत्यंत चुकीचे आहे. महाबली चौक व इतर ठिकाणच्या विक्रेत्यावर अन्यायकारक आणि चुकीची कारवाई करून सुमारे पंधरा दिवसापासून त्यांचा व्यवसाय बंद केला आहे. हा अधिकार त्यांना कोणी दिला, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना पगार सुरू आहे. आमच्या विक्रेत्यांची झालेली नुकसानभरपाई कोण देणार ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
तसेच महापालिकेच्या ‘अ’ व ‘फ’ प्रभाग कार्यालयाच्या अंतर्गत हॉकर झोनच्या ठिकाणी सोयी – सुविधा देण्याची मागणीही त्यांनी केली. अतिक्रमण कारवाई व फेरीवाला व्यवसायामध्ये समन्वय ठेवून योग्य नियोजन करावे. महापालिका दहा हजाराच्या कर्जासाठी एकीकडे अर्ज भरून घेते अन दुसरीकडे त्यांच्यावर कारवाई करते. ही दुटप्पी भूमिका आहे. प्रशासनाने योग्य भूमिका घेऊन विक्रेत्यांचे व्यवसाय सुरू केले नाही. तर, पुढच्या कालावधीमध्ये बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशाराही नखाते यांनी यावेळी दिला.