“जाती जोडून एकात्म भारतीय संस्कृती निर्माण करण्याची गरज!” – प्रा. डॉ. शरणकुमार लिंबाळे*

0
306

पिंपरी,दि. २९ (पीसीबी) – “जगात आणि देशात क्रौर्य, आक्रमकता अन् आक्रोश असे वातावरण आहे. अनेक परिवर्तनवादी चळवळींना जातिनिर्मूलन करता आलेले नाही. त्यामुळे जाती जोडून एकात्म भारतीय संस्कृती निर्माण करण्याची गरज आहे!” असे विचार ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, चिंचवडगाव येथे सोमवार, दिनांक २८ नोव्हेंबर २०२२ रोजी व्यक्त केले.

ज्येष्ठ साहित्यिक रमेश पतंगे यांच्या साहित्यकर्तृत्वाला वंदन करण्यासाठी क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीने आयोजित केलेल्या दोन दिवसीय ‘रमेश पतंगे साहित्य संगिती’ समारोहाचे उद्घाटन करताना लिंबाळे बोलत होते. पद्मश्री गिरीश प्रभुणे, रमेश पतंगे, माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे, क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती उपाध्यक्ष डॉ. शकुंतला बन्सल, कार्यवाह ॲड. सतीश गोरडे, डॉ. नीता मोहिते, अशोक पारखी आदींची प्रमुख उपस्थिती होती. शरणकुमार लिंबाळे पुढे म्हणाले की, “सर्वच जातीय अस्मिता अत्यंत प्रखर अन् टोकदार झालेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एकात्मतेची अन् समरसतेची भावना दिलासादायक आहे. रमेश पतंगे यांचे लेखन समाज घडविणारे आहे.

माणूस समजून घेऊन त्याला आपल्या परंपरांसह माणुसकीसाठी प्रवृत्त करण्याचा साहित्य संगितीचा उद्देश अतिशय स्तुत्य आहे!” पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी, “वेगवेगळ्या प्रसंगांमधून जातीय दुफळी, विद्रोह यामुळे समाजात विध्वंस घडू नये म्हणून रमेश पतंगे यांनी वेळोवेळी आपल्या साहित्याच्या माध्यमातून सलोखा निर्माण केला. त्यांच्या समग्र साहित्यावर चर्चा, ऊहापोह व्हावा म्हणून दोन दिवसीय साहित्य संगिती समारोहाचे आयोजन केले आहे!” अशी आयोजनामागील भूमिका मांडली. दीपप्रज्वलन आणि गुरुकुलम् मधील विद्यार्थिनींनी सादर केलेल्या ईशस्तवनाने समारोहाचा प्रारंभ करण्यात आला. उत्सवमूर्ती रमेश पतंगे यांनी आपल्या मनोगतातून, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार ही माझ्या लेखनाची प्रेरणा आहे. समग्र हिंदू समाजसंघटन, सर्व हिंदू समाजाच्या गुणदोषांसकट आत्मीयतेची भावना, उक्ती अन् कृती यामधील एकवाक्यता आणि आचरण या त्रिसूत्रीवर माझे लेखन आणि जीवन आधारित आहे!” अशा भावना व्यक्त केल्या.

त्यानंतर डॉ. प्रसन्न पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ‘महामानव डॉ. आंबेडकर : समरसतेचा परिप्रेक्ष्य’ या पहिल्या परिसंवादात ममता सोनवणे (‘संघर्ष महामानवाचा’), शाहिर आसाराम कसबे (‘सामाजिक न्याय आणि डॉ. आंबेडकर’), प्रा. डॉ. धनंजय भिसे (‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्र उभारणीतील योगदान’) या पुस्तकांवर चिंतन करण्यात आले. डॉ. सुनील भंडगे यांच्या अध्यक्षतेखाली ‘स्थानिय समस्यांचे जागतिक आकलन’ या दुसऱ्या परिसंवादात अमोल दामले (‘अब्राहम लिंकन’), प्रा. पूनम गुजर (‘बुकर टी वाशिंग्टन’), रमेश वाकनीस (‘डॉ. मार्टिन ल्युथर किंग’) यांनी परकीय व्यक्तिमत्त्वांचा आपल्या स्थानिक समस्यांच्या संदर्भातील तौलनिक अनुबंध मांडला. प्रा. डॉ. संजय तांबट यांच्या अध्यक्षतेखाली ‘आत्मकथनाऐवजी’ या तिसऱ्या परिसंवादात सतीश अवचार (‘मी, मनू आणि संघ’), सुनीता सलगर (‘अंगुस्थान ते लेखणी’), मंगला सपकाळे (‘समरसतेचा वाटसरू’) या पतंगे यांच्या आत्मकथनपर पुस्तकांचे अंतरंग उलगडून दाखवले.

दरम्यानच्या काळात रवींद्र गोळे यांनी दीर्घ मुलाखतीच्या माध्यमातून रमेश पतंगे यांची चार दशकांची साहित्यिक वाटचाल, वैचारिक भूमिका, लेखन प्रेरणा अन् प्रक्रिया याविषयी संवाद साधला; तसेच मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या आपले संविधान : तत्त्वविचार, मूल्य संकल्पना, ध्येयवाद’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. नटराज जगताप यांनी सहभागी मान्यवरांचा परिचय करून दिला. रवींद्र गोळे यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले