उद्धव ठाकरे यांची शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विळख्यातून बाहेर पडायला तयार नाही – उदय सामंत

0
288

पिंपरी,दि.7 (पीसीबी) – दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत जाण्याची वेळ आल्यास शिवसेना हे दुकान बंद करेन, असे सुनावले होते. परंतु, उद्धव ठाकरे यांची शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कचाट्यात सापडली होती. आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रमध्ये युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सहभागी होणार आहेत. या निमित्ताने अद्यापही उद्धव ठाकरे यांची शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विळख्यातून बाहेर पडायला तयार नसल्याचे दिसते, असे मत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.

चिंचवड ऑटो क्‍लस्टर येथील प्रदर्शनाला मंत्री सामंत यांनी आज (सोमवारी) भेट दिली. भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, बाळासाहेबांची शिवसेनेचे युवासेना प्रमुख विश्वजित बारणे, पिंपरी विधानसभा प्रमुख राजेश वाबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सर्व आमदार असून सरकारला 170 आमदारांचा पाठिंबा आहे. ही संख्या वाढून 172 वर जाईल. सरकार मजबूत आहे. केवळ उर्वरित आमदार टीकविण्यासाठीच विरोधकांकडून सरकार पडण्याच्या वल्गना केल्या जात असल्याचे सांगत मंत्री सामंत म्हणाले, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना वापरलेले शब्द चुकीचे आहेत. त्याचे मी समर्थन करत नाही.