मरताना ते पद लागणार नाही, मी मरताना एक हिंदू मेला असं लोक सांगणार – नितेश राणे

0
208

पिंपरी,दि.०२(पीसीबी) – भाजपा आमदार नितेश राणे यांनी “चुलीत जाऊ द्या आमदारकी, डब्यात जाऊ द्या ती खासदारकी, कोण मोजत नाही,” असं वक्तव्य केलं आहे. तसेच मी मरताना ते आमदार पद लागणार नाहीये. मी मरताना एक हिंदू मेला असं ते लोक सांगणार आहेत, असंही म्हटलं. बुधवारी (२ नोव्हेंबर) कोल्हापुरात लव्ह जिहादविरोधात हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी आमदार राणे बोलत होते.

नितेश राणे म्हणाले, “मुस्लिमांना आंदोलन करण्याची वेळ आली अशी एक घटना दाखवा. त्यांच्या कोणत्याही व्यक्तिकडे किंवा धर्माकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर ते त्याला जीवंत ठेवत नाही. अशी असंख्या उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो. मात्र, आपल्याला टोप्या घालाव्या लागतात, गमछे घालावे लागतात, घोषणा द्याव्या लागतात. आपल्याला किरण पावसकर, नितेश राणे लागतात, मगच आपण काहीतरी करतो आणि मगच आपण काहीतरी करतो. हीच आपली शोकांतिका आहे.”

“आम्ही भाषणं देण्यासाठी इथं जमलेलो नाही. चुलीत जाऊ द्या आमदारकी, डब्यात जाऊ द्या ती खासदारकी, कोण मोजत नाही. मी मरताना ते आमदार पद लागणार नाहीये. मी मरताना एक हिंदू मेला असं ते लोक सांगणार आहेत. म्हणून हिंदू म्हणून तुम्ही कसे जगणार आहात, हिंदू म्हणून आपल्या धर्माचं कसं रक्षण करणार आहात हे आज ठरवण्याची गरज आहे,” असं मत नितेश राणे यांनी व्यक्त केलं.

“नगरमध्ये एका हिंदू मुलाने एका मुस्लीम तरुणीशी लग्न केलं. त्यानंतर तिकडच्या सर्व मुस्लिमांनी एकत्र येऊन त्या मुलाला ठेचून काढलं. कारण तो मुलगा हिंदू होता. ते लोक धरणं देत बसली नाही, टोप्या घालत घोषणा देत बसली नाही. घरात माता-भगिणी सुरक्षित नसतील तर तुम्हाला जय श्रीराम म्हणण्याचा आणि भगव गमछा घालण्याचा काय अधिकार आहे?” असा सवाल राणेंनी विचारला.

नितेश राणे पुढे म्हणाले, “मी सगळ्या पोलीस खात्याला दोष देत नाही. सगळे पोलीस तसे नसतात, पण काही मोजके जे नालायक आहेत त्यांना तर शिक्षा मिळणारच हा शब्द मी तुम्हाला देतो. मात्र, सगळ्याच पोलिसांना जे बोललं जातंय ते चुकीचं आहे. आज राज्यात हिंदुत्वाच्या विचाराचं सरकार आहे. आज राज्याचा अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक नाही, हसन मुश्रीफ मंत्री नाही, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नाही. हिंदू म्हणून वाकड्या नजरेने पाहिलं तर त्याचा सत्कार व्हायला हे मविआ सरकार नाही.”

“तुम्ही हिंदू म्हणून आवाज उठवा, एकत्र या. तुम्हाला पुढे कसं सुखरुप घरी पाठवायचं हे नितेश राणे पाहून घेईल. मी तुम्हाला शब्द देतो. कारण तिथं देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून बसले आहेत हे लक्षात ठेवा. एक कडवट हिंदुत्ववादी माणूस गृहमंत्री म्हणून बसले आहेत.त्यामुळे तुम्ही काहीच चिंता करू नका. फक्त हिंदू समाज म्हणून भीती निर्माण करणं गरजेचं आहे,” असंही नितेश राणेंनी म्हटलं.