‘राष्ट्रीय एकता दौड’ला मोठा प्रतिसाद

0
358

पिंपरी,दि.०१(पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आठही प्रभागांमध्ये आयोजित केलेल्या ‘राष्ट्रीय एकता दौड’ मध्ये शहरवासीयांनी उस्फुर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. देशाची एकता, अखंडता तसेच सुरक्षितता जपण्यासाठी नागरिकांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देखील यावेळी घेतली.

भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. भारतात अनेक जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहतात. विविध परंपरा आणि संस्कृतीचा मिलाफ असणाऱ्या भारत देशामध्ये विविधतेमध्ये एकता पाहायला मिळते. देशाचे पहिले गृहमंत्री तथा माजी उपपंतप्रधान भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारत देशाची एकात्मता कायम टिकून राहावी यासाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न केले आहेत. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 31 ऑक्टोबर रोजी ‘राष्ट्रीय एकता दिवस’ साजरा केला जातो. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

महापालिकेच्या वतीने शहरातील आठही प्रभागांमध्ये एकता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये शहरातील माजी पदाधिकारी, नगरसदस्य, अनेक संघटना, क्रीडा संस्था, बेसिक्स संस्था, डिव्हाईन संस्थेचे सदस्य, खेळाडू, विविध योगा ग्रुपचे सदस्य, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त राष्ट्रीय अबाधित राहण्यासाठी उपस्थितांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली.

अ प्रभाग मधील दुर्गाटेकडी येथे झालेल्या कार्यक्रमास क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे, सहायक आरोग्य अधिकारी राजू साबळे यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी, एन एस एसचे (राष्ट्रीय सेवा योजना) सदस्य तसेच नागरिक उपस्थित होते. ब प्रभागमधील वाल्हेकरवाडी येथील चिंतामणी चौक येथे झालेल्या कार्यक्रमास उपआयुक्त चंद्रकांत इंदलकर, क्षेत्रीय अधिकारी सोनम देशमुख, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, सहायक आरोग्याधिकारी एम.एम.शिंदे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी आय ई सी टीम बेसिक्स आणि टीम डिव्हाईनचे सदस्य तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते.

क प्रभागमधील स्पाईन रोड याठिकाणी झालेल्या कार्यक्रमास क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, क्रीडाधिकारी अनिता केदारी, माजी सहाय्यक पोलीस आयुक्त एस. बी. भोसले, माजी शिक्षण मंडळ सभापती विजय लोखंडे, सहायक आरोग्य अधिकारी तानाजी दाते यांच्यासह आय ई सी टीम बेसिक्स आणि टीम डिव्हाईनचे सदस्य, खेळाडू, योगा ग्रुपचे सदस्य तसेच ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. ड प्रभागमधील पिंपळे सौदागर येथील लिनीअर गार्डन येथे क्षेत्रीय अधिकारी उमाकांत गायकवाड, सहायक आरोग्य अधिकारी महेश आढाव, क्रीडा पर्यवेक्षक गोरक्ष तिकोणे, आरोग्य निरीक्षक प्रणय चव्हाण यांच्यासह सिटी प्राईड विद्यालयाचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य तसेच टीम बेसिक्सचे सदस्य उपस्थित यांची उपस्थिती लाभली.

इ प्रभागमधील भोसरी येथील सखुबाई गवळी उद्यानात येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रशासन अधिकारी राजाराम सरगर, मुख्य आरोग्य निरीक्षक राजू बेद, आरोग्य निरीक्षक उद्धव डवरी, सुरेश चनाल यांच्यासह टीम बेसिक्सचे सदस्य तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. फ प्रभागमधील तळवडे गावठाण उद्यान येथे झालेल्या कार्यक्रमास क्षेत्रीय अधिकारी सीताराम बहुरे, माजी नगरसेवक पंकज भालेकर, मुख्य आरोग्य निरीक्षक श्रीराम गायकवाड, आरोग्य निरीक्षक राकेश सौदाई यांच्यासह नागरिक, खेळाडू उपस्थित होते.

ग प्रभागमधील चिंचवड येथील साधू वासवानी उद्यान येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य आरोग्य निरीक्षक वसंत सरोदे, आरोग्य निरीक्षक सतिश इंगेवाड, जिजामाता प्रभाग शाखेचे रमेश साठे, अशोक कोल्हे, ओमप्रकाश सीशिट, किशोर कांबळे, मोहन गंगवाणी, प्रकाश छतानी, सुनील खैरनार, नरेन भागचंदानी, सचिन खाडे, जयकुमार रामनानी, मच्छिंद्र कोल्हे, मनोहर शेवानी, राजेश्वर तायडे यांच्यासह ट बेसिक्स, डिव्हाईन संस्थेचे सदस्य, खेळाडू तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रतिनिधी यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. ह प्रभागमधील सांगवी येथील साई चौक येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमास क्षेत्रीय अधिकारी विजयकुमार थोरात, सहायक आरोग्य अधिकारी सतीश पाटील यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी, खेळाडू, योगा ग्रुपचे सदस्य तसेच ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.