मुंबई, दि. २३ (पीसीबी) : राज्यीतील ४३ आयपीएस अधिकाऱ्यांच्या आज बदल्या करण्यात आल्या पुण्याच्या ग्रामिण पोलीस अधिक्षकपदी अंकित गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर बसवराज तेली यांची सांगलीचे, शिरीष सरदेशपांडे यांची सोलापूरचे आणि सातारचे पोलीस अधिक्षक म्हणून समीर शेख यांची नियुक्ती झाली आहे.
राज्यात महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचं सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येंने पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार अशा चर्चा सुरु होती. मात्र अखेर आज बदल्यांचा शासन निर्णय गृह विभागाकडून जारी करण्यात आला.
दरम्यान, राज्यातील 43 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आज करण्यात आल्या. यापैकी 24 जणांना नव्या ठिकाणी नियुक्ती देण्यात आली आहे. उर्वरित 19 अधिकाऱ्यांची त्यांच्या सध्याच्या ठिकाणावरून बदली करण्यात आली आहे. मात्र, त्यांच्या नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या नाहीत. येत्या काही दिवसात या अधिकाऱ्यांना त्यांच्या नव्या नियुक्त्या सांगण्यात येतील असे समजते.