साडेसहा कोटींच्या फसवणूक प्रकरणात वर्षभरानंतर कांचन कुंदन ढाके यांच्यासह सहा जणांना अटक

0
408

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) : रिअल इस्टेट कंपनीकडून कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याने एका सिक्युरिटी फोर्स कंपनीमालकाने पत्नीसह आत्महत्या करण्याचे गेल्यावर्षी ठरविले. त्यासाठी सुसाईट नोटही लिहीली. पण, तत्कालीन पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश तथा केपी यांच्या तत्पर हालचालीमुळे ही आत्महत्या टळली गेली. दरम्यान, केपी आयुक्त असताना या उद्योजकाने दिलेल्या फसवणुकीच्या तक्रारीवर वर्षभरानंतर आता म्हणजे १२ ऑक्टोबर पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या काळात गुन्हा दाखल होऊन आरोपींना अटक झाली आहे.

दरम्यान, या अपहार व फसवणुकीच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी व सिद्धीविनायक ग्रुप कंपनी या रिअल इस्टेट कंपनीचा अध्यक्ष कुंदन दत्तात्रेय ढाके (रा. आकुर्डी,पिंपरी-चिंचवड) याचे कोरोना काळात निधन झाले. त्यामुळे या कंपनीच्या इतर सहा संचालकांना पोलिसांनी काल (ता.१२) अटक केली. त्यात कुंदनची पत्नी कांचन हिचाही समावेश आहे. सुनील झांबरे, चंद्रशेखर अरुण चौधरी, पंकज प्रल्हाद चौधरी, किरण गिरीधर चौधरी, मुकेश अशोक कोल्हे अशी इतर आरोपींची नावे आहेत. त्यांना १७ तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने आज दिला. “

मिलिंद मधुकर चौधरी (वय ५१, रा.निगडी प्राधिकरण, पिंपरी-चिंचवड) असे या फसल्या गेलेल्या उद्योजकाचे नाव आहे. त्यांची गेल्या पाच वर्षात ही फसवणूक झाली आहे. एलएमसी सिक्युरिटी फोर्स नावाची त्यांची कंपनी आहे. ते मूळचे भुसावळचे. तर, ढाके याच्यासह सर्व आऱोपीही भुसावळचेच आहेत. आरोपींनी गुंतवणुकीचे तीन महिन्यात तिप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवून मिलिंद चौधरींकडून सहा कोटी ३४ लाख रुपये घेतले. तिप्पट सोडा, मूळ रक्कमही त्यांनी देण्यास नंतर नकार दिला. त्यामुळे व्याज काढून ही गुंतवणूक केलेल्या चौधरींचा धंदा, तर बसलाच. त्यामुळे कर्जाचे हफ्ते भऱायलाही त्यांच्याकडे पैसे न राहिल्याने त्यांनी पत्नीसह आत्महत्या करायचे ठरवले.

त्यासाठी त्यांनी सुसाईट नोटही लिहिली. पण, ओळखीतील महिला स्वामीभक्ताच्या आग्रहाखातर ते चिंचवडला स्वामींच्या मठात गेले. तेथील मठचालकांनी त्यांना सीपी केपींकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांनी गेल्यावर्षी ९ ऑगस्टला केपींची भेट घेत लेखी तक्रार दिली. त्यावर केपींनी आरोपींना बोलावून पोलीस भाषेत समजावले. त्यानंतर आरोपींनी चौधरींना त्यांच्या गुंतवणूक रकमेचे पाच चेक दिले. पण, ते खात्यात पैसे नसल्याने वटलेच नाहीत. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच काल चौधरींनी पुन्हा निगडी पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार दिली. त्यावर वरिष्ठ निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी तातडीने गुन्हा दाखल करून घेत सर्व आरोपींच्या मुसक्या आवळल्या. पोलिस निरीक्षक विश्वजीत खुळे पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान, स्वामी कृपा आणि केपींनी फसवणुकीच्या रकमेचे धनादेश आरोपींकडून काढून दिल्याने आत्महत्येची चिठ्ठी लिहून सुद्धा आपण ती केली नाही, असे मिलिंद चौधरी यांनी सांगितले. दरम्यान, त्यांना गुंतवणूक केलेल्या रकमेसाठी कर्ज काढताना आपला बंगला गहाण ठेवावा लागला असून नवीकोरी मर्सीडीज ही आलिशान मोटारही विकावी लागली आहे. दुसरीकडे त्यांनी काढलेल्या सहा कोटी ३४ लाख रुपये कर्जाचा डोंगर आता व्याजासह आता २५ कोटी ८ लाख चाळीस हजार ४९१ रुपये एवढा झाला आहे.