पिंपरी, दि. १० (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरात अनुसूचित जाती जमातींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शहरातील अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षासाठी पुणे शहरात यावे लागते. अनेकांना ते शक्य होत नाही. त्यामुळे शहरात बार्टीचे उपकेंद्र सुरु करण्याची मागणी रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने बार्टीचे महासंचालक यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार 22 डिसेंबर 1978 रोजी समता विचारपीठाची स्थापना करण्यात आली. संस्थेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी ऑक्टोबर 2008 च्या शासन निणार्यानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे या स्वायत्त संस्था म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या संस्थेचा मुख्य उद्देश संशोधन व प्रशिक्षण आणि सामाजिक समता वृद्धिंगत करण्यासाठी शैक्षणिक उपक्रम, -संमेलने, व्याख्याने, परिसंवाद आयोजित करणे आणि सामाजिक समता या तत्वप्रणाली चा अभ्यास विविध ठिकाणी संस्थेचे उपकेंद्र सुरू करणे आहे.
बार्टी उपकेंद्रच्या माध्यमातून अनुसूचित जाती जमातीच्या मुला-मुलींसाठी केंद्रीय व राज्य स्तरीय स्पर्धा परीक्षा तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केंद्र पिंपरी- चिंचवड येथे सुरु करावे. तसेच सर्व महामानवांचे जीवन चारित्र्य, महिला सक्षमीकरण, समतावादी विचाराचे साहित्य वाचकांसाठी उपलब्ध होईल. पिंपरी-चिंचवड शहरात अनेक नाविन्यपूर्ण व समाजहिताचे उपक्रम राबविले जातात त्यामुळे शहराची एक नवी ओळख आणि एक वेगळा ठसा निर्माण झाला असून आता शिक्षणाबरोबरच संशोधन, प्रशिक्षण व सामाजिक तत्व प्रणालीचा विकास होणे गरजेचे आहे.
पिंपरी-चिंचवड शहर हे ज्ञानाचे केंद्र बनण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे या संस्थचे उपकेंद्र शहर येथे सुरू करणे गरजेचे आहेत. जेणेकरून शहरातील विद्यार्थी, युवक, शासकीय कर्मचारी आणि महिला यांना प्रशिक्षण, संशोधन तसेच लेखक व साहित्यिक यांना समतावादी विचाराचे साहित्याचे लेखन व साहित्य प्रकाशनाचे एक नवीन दालन सुरू होईल.
रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे,प्रदेश महासचिव संतोष शिंदे,पिंपरी- चिंचवड अध्यक्ष मयूर जगताप यांच्या वतीने बार्टी संस्थेचे महासंचालक यांना निवेदन देण्यात आले.