– १०० कोटी रुपयेंच्या वसुली आरोपावरुन ईडी कारवाईमुळे ११ महिने जेल भोगली
मुंबई, दि. ४ (पीसीबी) – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. उच्चा न्यायालयाचे न्यायमूर्ती एन जे जमादार यांनी देशमुख यांचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. मात्र, त्यांच्या सुटकेबाबत प्रश्नचिन्ह आहे. ईडीकडून दाखल गुन्ह्यात जामीन मंजूर करण्यात आला आहे. पण सीबीआयकडून त्यांची अद्याप सुटका नाही.
१०० कोटींच्या वसुलीचा आरोप असलेल्या देशमुख यांनी ईडीने अटक केली होती. जवळपास ११ महिने अनिल देशमुख यांनी तुरुंगात काढले असून त्यांच्या जामिनावर बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. देशमुख यांनी १ लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला असून ते नोव्हेंबर २०२१ पासून तुरुंगात होते.
अनिल देशमुख यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि अटकेत असलेले माजी पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांनी 100 कोटी खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचा आरोप करण्यात आला होता. परमबीर सिंह यांनी पत्रातून हे आरोप केले होते. या प्रकरणी न्यायालयाने गुन्हा दाखल करून सीबीआय चौकशीचे आदेश दिले.सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने देखील या प्रकरणात कारवाई केली. अनिल देशमुख यांच्यावर आपल्या पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचा आणि बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप करण्यात आला.
ईडीच्या आरोपांनुसार, सचिन वाझेने मुंबईतील ऑर्केस्ट्रा बारमालकांकडून 4.7 कोटी रुपये उकळले आणि ही रक्कम अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे यांना दिली, जे नंतर नागपूरला गेले आणि त्यांनी एका व्यक्तीला है पैसे सोपवले. हवालाद्वारे हे पैसे दिल्लीस्थित सुरेंद्र कुमार जैन आणि वीरेंद्र जैन यांना पाठवले गेले होते. ते दोघेही बनावट कंपन्या चालवत होते. जैन यांनी हे पैसे नागपूरच्या श्री साई एज्युकेशनल इन्स्टिट्यूट या देशमुख कुटुंबाच्या नियंत्रणाखाली असलेल्या ट्रस्टला दान केल्याचा आरोप ईडीने केला आहे.
जामीन मंजूर पण तुरुंगाबाहेर नाही!
अनिल देखमुख यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल आहेत. यातील ईडीच्या गुन्ह्यात त्यांना जामीन मंजूर झाला आहे. पण त्यांच्यावर सीबीआयचाही गुन्हा दाखल आहे. या प्रकरणातही त्यांना जामीन मंजूर होत नाही तोवर ते तुरुंगातून बाहेर येऊ शकणार नाहीत.