पिंपरी दि. २९ (पीसीबी) – भारत हा कृषिप्रधान देश आहे. संपूर्ण भारत देशामध्ये कोरोना महामारी नंतर आता पाळीव जनावरांवर लम्पी आजाराचा प्रादुर्भाव होत आहे. या आजाराचा फटका देशातील गुजरात, उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, मध्ये प्रदेश, जम्मू-काश्मीर या राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात देखील या आजाराचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे राज्यासह देशाचे पशुधन धोक्यात आले आहे.
त्यामुळे राज्यशासनाने व केंद्र शासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीची पावले उचलावीत व गोवंशासह देशी दूभत्या जनावरांचे वेळीच रक्षण करावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रवक्ते श्री. रविकांत वरपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली.
अतिवृष्टीने शेतकऱ्याच्या शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महाराष्ट्रात ग्रामीण अर्थचक्र हे शेती व्यवसायाबरोबरच दुधाच्या व्यवसायावर अवलंबून आहे, यातून शेतकऱ्याला आर्थिक हातभार लागत असतो. आता लंपी विषाणूमुळे शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा मोठे संकट ओढवलं आहे.
देशात राजस्थान या राज्यात ६५ हजार, पंजाब मध्ये ३० हजार गुरांचा लंपी आजारमुळे मृत्यू झाला आहे.राजस्थानातील दूध उत्पादन ३० टक्क्यांनी, तर पंजाब गुजरतमध्येही जवळपास १० टक्क्यांनी दूध उत्पादन घटले आहे. जवळपास ५०० कोटींचे नुकसान एकट्या राजस्थान राज्याचे झाले आहे.
महाराष्ट्रात जवळपास २२ जिल्ह्यांत लम्पी रोग पसरला आहे. ११ सप्टेंबर ला राज्यात ३१० गावांमध्ये २३८७ गुरांना बाधा व ४१ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर १० दिवसानंतर २० सप्टेंबर ला तब्बल १० हजार गुरांना बाधा झाली व २७१ जणांचा मृत्यू झाला. आणि आता २४ सप्टेंबर पर्यंत २१ हजार ९४८ गुरांना लागण झाली व सुमारे ८०० गुरांचा मृत्यू झाला आहे.
अशा कठीण परिस्थितीत जर लसीकरण युद्ध पातळीवर केले नाही, तर लाखो जनावरे दगावतील आणि त्याचा परिणाम दूध उत्पादनावर होईल, असे रविकांत वर्पे म्हणाले. तसेच शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीवरही मोठ्या प्रमाणात परिणाम होईल, ही भीती वरपे यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्रात हजारो कोटीची गुंतवणूक असलेला मोठा दुग्ध व्यवसाय आहे. दुधाच्या व्यवसायाचा महाराष्ट्राच्या दरडोई उत्पन्नात सर्वात मोठा वाटा आहे.
देशातील बहुतांश राज्यात गोवंशहत्याबंदी कायदा लागू केल्यानंतर थकलेल्या,आजारी व उत्पादनक्षमता नसलेल्या भाकड जनावरांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले. या भाकड जनावरांना शेतकरी वर्गाने सांभाळण्यास असमर्थता दर्शवत मोकळे सोडून दिले. कोणतीही निगा, स्वच्छता, उपचार नसलेली ही भाकड जनावरे लम्पी आजाराला लवकर बळी पडत आहेत. या आजारी जनावरांचा संपर्क पाळीव जनावरांशी आल्यावर लम्पी आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे भाकड जनावरांचे संगोपन व निगा तसेच या भाकड जनावरांचे लसीकरण घेण्याबाबतचे धोरण केंद्र शासनाने वेळीच ठरवणे, त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे, भाकड जनावरांच्या व्यवस्थापनात देश पातळीवर सुसुत्रता आणणे आवश्यक आहे, असे रविकांत वरपे म्हणाले.
आज महाराष्ट्रात शिंदे- फडणवीस सरकार हे स्वताला हिंदुत्ववादी म्हणतात, ते गाई बाबत नेहमी गंभीर असतात. बजरंग दल, आरएसएस, विश्व हिंदू परिषद, भाजप आता कुठे आहेत? असा सवाल रविकांत वरपे यांनी केला.
केवळ गोमांस बाळगल्याच्या संशयावरून लोकांना मारहाण करणारे, लोकांचे प्राण घेणारे एकत्र येऊन सरकारला जाब विचारताना दिसत नाही, ही खंत रविकांत वर्पे यांनी यावेळी प्रसिद्ध पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे. आजारी गोमातेची काळजी घेण्यासाठी पुढे येत नाहीत. फक्त राजकारणासाठी गाईचा उपयोग करणार असेल तर हे मोठं पाप केंद्र सरकार आणि शिंदे-फडणवीस सरकार करतंय, असे प्रतिपादन वर्पे यांनी केले.
“जर हे सरकार लंपी आजाराबाबत उपाययोजना करून, युद्ध पातळीवर लसीकरण मोहिम हाती घेत नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यातील पशुधन वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल.”