राज्यातील नद्या अमृतवाहिनी करण्यासाठी गांधी जयंतीपासून श्रीगणेशा

0
391

– वर्धा येथील सेवाग्राम मधील कार्यक्रमासाठी डाॅ. राजेंद्र सिंह यांची उपस्थिती

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – महाराष्ट्रामध्ये गोदावरी, कृष्णा, तापी, नर्मदा, पश्चिम वाहिन्यांच्या खोऱ्यातील 75 नद्या अमृतवाहिनी करण्यासाठी गांधी जयंतीपासून (ता. 2 ऑक्टोंबर) सुरवात होईल. वर्धा येथील सेवाग्राममध्ये आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डाॅ. राजेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत चला जाणूया नदीला महोत्सवाची सुरवात होईल. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील मुठा, पवना, इंद्रायणी आणि रामनदी खोऱ्याचाही पाहणी होणार असल्याचे, समन्वयक नरेंद्र चूग यांंनी सांगितले आहे.

जलबिरादरीचे ब्रँड अॅम्बेसिडर अभिनेते चिन्मय उदगीरकर हे असतील. देशातील स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे, अशी माहिती सांगून महाराष्ट्र जलबिरादरीचे अध्यक्ष नरेंद्र चुग म्हणाले, की आम्ही सिंहावलोकन केल्यावर प्रगती किती साधली आहे, याची कल्पना येते. तसेच आपल्या आणि समाजापुढील प्रश्नांची सोडवणूक करण्याची ऊर्जा तरुणांमध्ये आहे. तरुण स्वतः आणि देशवासियांच्या आरोग्यविषयी सजग आहेत आणि ते काळजी घेताहेत. त्यातूनच आपले आरोग्य सदृढ राखण्यासाठी नदीचे आरोग्य ठीक करण्याचा संकल्प तरुणांसोबत महाराष्ट्रातील जनतेने केला आहे. म्हणूनच राज्यातील 75 नद्या अमृतवाहिनी करण्यासाठी जलबिरादरीतर्फे समाजाच्या सहभागातून चला जाणूया नदीला हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
त्यामुळे देशाच्या स्वातंत्र्यामध्ये योगदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांची प्रेरणा घेऊन त्यास तरुणांमधील ऊर्जा व त्यांचा दृष्टीकोन जोडण्यात येणार आहे.

सुधीर मुनगंटीवार यांचे सहकार्य
राज्याला पूर आणि दुष्काळमुक्त करण्यासाठी समाजाच्या सहभागाला पाठबळ देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. महाराष्ट्र सरकारचे वन आणि सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार हे सहकार्य करत आहेत. 2 ऑक्टोंबरला वर्धा येथील कार्यक्रमात राज्यातील विविध 75 नद्यांसाठी कार्यरत असलेले 110 जलनायक सहभागी होणार आहेत. त्यांच्याकडे डाॅ. सिंह, अभिनेते चिन्मय उदगीरकर, श्री. मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत जलकलश आणि ध्वज सुपूर्द केला जाईल. 15 ऑक्टोंबर 2022 रोजी भारतरत्न डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनी राज्यातील 75 नद्यांवर एकाचदिवशी नदी यात्रेला सुरवात होईल. त्यामध्ये नदी अभ्यासक, नदी प्रेमी, शेतकरी, विद्यार्थी, नदीचे स्टेक होल्डर, सरकारी यंत्रणांमधील अधिकारी यांचा सहभाग राहील. प्रत्येक नदीच्या यात्रेवेळी किमान 100 जणांचा सहभाग राहील, असा प्रयत्न राहील. 26 जानेवारी 2023 पर्यंत चालणाऱ्या नदी यात्रेवेळी नदीच्या सध्यस्थितीची माहिती संकलित करुन अविरल, निर्मल नदी करण्यासाठी आराखडा तयार करण्यात येणार आहे.

नदी आराखड्याविषयी
नदी यात्रेवेळी सरकारी यंत्रणेचे अधिकारी आणि नदीशी निगडीत समाजाच्या सहभागातून सध्यस्थितीची माहिती संकलित केली जाईल. स्थानिक रहिवाश्यांकडून नदी अविरल, निर्मल होण्यासाठी पारंपारिक ज्ञान समजावून घेतले जाईल. त्याला आधुनिक विज्ञानाची जोड देत आराखडा तयार केला जाईल. या आराखड्याची महाराष्ट्र सरकारचे सहकार्य आणि समाजाच्या सहभागातून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी केली जाईल.