सरसंघचालक मोहन भागवत यांची इमाम यांच्याबरोबर तासभर मशिदीत चर्चा

0
401

दिल्ली, दि. २२ (पीसीबी) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज दिल्लीत ऑल इंडिया इमाम संघटनेचे प्रमुख इमाम डॉ. इमाम उमर अहमद इलियासी यांची भेट घेतली. या भेटीपूर्वी माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस.वाय. कुरेशी आणि दिल्लीचे माजी उपराज्यपाल नजीब जंग यांच्यासह मुस्लिम विचारवंतांच्या एका गटाने भागवत यांची भेट घेतली होती. सरसंघचालक भागवत दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्ग मशिदीतील मुख्य इमाम इलियासी यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या कार्यालयात पोहोचले होते.

संघप्रमुखांच्या इलियासी यांच्या भेटीबाबत आरएसएसचे प्रचारप्रमुख सुनील आंबेकर म्हणाले, संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे सर्व स्तरातील लोकांना भेटतात. हा नेहमीच कार्यरत असलेल्या सामान्य संवाद प्रक्रियेचा भाग आहे. इमाम इलियासी आणि भागवत यांच्यात एक तासाहून अधिक काळ बैठक झाली. भागवत यांच्यासोबत आरएसएसचे वरिष्ठ पदाधिकारी कृष्ण गोपाल, रामलाल आणि इंद्रेश कुमार उपस्थित होते.

मुस्लिमांची संघटना असलेल्या जमियत-उलेमा-ए-हिंदचे नेते मौलाना अर्शद मदनी यांनीही 30 ऑगस्ट 2019 रोजी दिल्लीत संघाच्या मुख्यालयात मोहन भागवत यांची भेट घेतली. मुस्लिम राष्ट्रीय मंचचे नेते इंद्रेश कुमार यांच्या प्रयत्नातून झालेल्या या बैठकीचीही बरीच चर्चा झाली. अयोध्येतील राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापूर्वी (9 नोव्हेंबर 2019) व निकाल आल्यानंतर दोन्ही समुदायांमध्ये शांतता राखण्याच्या दृष्टिकोनातून दोन्ही प्रमुख नेत्यांची ही भेट अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात होती.

येत्या काही दिवसांत संघप्रमुख मोहन भागवत काश्मीरमधील काही मुस्लिम नेत्यांचीही भेट घेऊ शकतात, अशी चर्चा आहे. काश्मीरमध्ये निवडणुकीच्या दृष्टीकोनातून राजकीय हालचाली सुरू झाल्यानंतर, काश्मीर खोऱ्यात शांतता राखणे हे महत्त्वपूर्ण आहे.
आरएसएस आणि भाजपचे नेते सतत मुस्लिमांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. भागवत यांनी यापूर्वीही, ‘मुस्लिमांशिवाय भारत पूर्ण होऊ शकत नाही,’ असे वक्तव्ये केली आहेत. काश्मीरचे नेते गुलाम अली खटाना यांना राज्यसभेवर पाठवणे हे संघ परिवाराचा मुस्लिमांच्या जवळ जाण्याची निती आहे.