पवना धरणातून 280 दिवस पुरेल इतक्‍या पाण्याचा विसर्ग

0
429

पिंपरी दि. १९ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणा-या पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात परिसरात 18 सप्टेंबरअखेरपर्यंत 2 हजार 624 मिलीमीटर अधिक पाऊस झाला आहे. गतवर्षीपेक्षा यंदा 204 मिलीमीटर अधिकचा पाऊस झाला आहे. तर, शहराला 280 दिवस पुरेल इतका म्हणजे तब्बल 1 लाख 42 हजार 877 एमएलडी पाण्याचा धरणातून नदी पात्रात विसर्ग करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवडसह मावळ भागातील विविध गावांचा पाण्याचा मुख्य स्रोत पवना धरण आहे. महापालिका सध्या धरणातून 510 एमएलडी पाणी उचलते. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना नदीवरील रावेत-पुनावळे दरम्यान असलेल्या बंधाऱ्यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो. सेक्‍टर 23 निगडी येथे पाणी शुद्ध करुन शहरवासीयांना पुरवठा केला जातो. जून महिन्यात फक्त 43 मिली मीटर पाऊस पडला. त्यामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्‍यता निर्माण झाली होती. मात्र, 1 जुलैपासून दमदार पावसाला सुरुवात झाली.

झपाट्याने धरणातील पाणीसाठा वाढल्याने वाढीव पाणीकपात टळली. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाने चांगलीच विश्रांती घेतली होती. ऑगस्टमध्ये पावसाने पुन्हा जोरदार बॅटींग केली. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली. धरणातून पाण्याचा विसर्ग देखील करावा लागला. 20 ऑगस्टला धरण 100 टक्के भरले. त्यानंतर पावसाने पुन्हा विश्रांती घेतली होती. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून पुन्हा पावसाने धरण परिसरात जोर धरला आहे. त्यामुळे सातत्याने पाण्याचा विसर्ग करावा लागला. 18 सप्टेंबरअखेर गतवर्षी 2 हजार 420 तर यंदा 2 हजार 624 मिली मीटर पावसाची धरण परिसरात नोंद झाली.

यंदा जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात दमदार पाऊस झाला. त्यामुळे धरणातून वेळोवेळी पाण्याचा विसर्ग करावा लागला. शुक्रवारसकाळपर्यंत तब्बल 1 लाख 42 हजार 877 एमएलडी पाणी धरणातून विसर्ग करण्यात आले. हे पाणी पिंपरी-चिंचवड शहराला सुमारे 280 दिवस पुरेल इतके होते. पवना धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात यंदा विसर्ग झाल्याने सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणही यावर्षी लवकरच भरले आहे.