– …आधी तुमच्या सरगुजा जिल्ह्यातील शाळांची दयनीय अवस्था सुधारा
नारायणगाव (जि. पुणे), दि. १६ (पीसीबी) : केंद्रात तुमचे तर राज्यात तुमच्या विचाराचे सरकार आहे. भाषणबाजी करून राजकीय टीका करण्यापेक्षा रस्त्याचा प्रश्न समजून घेऊन भूमिपुत्रांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळवुन देण्यासाठी सहकार्य करा. तुमच्या सरगुजा जिल्ह्यातील शाळांची दयनीय अवस्था सुधारावी. जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील आदिवासी बांधवांच्या प्रगतीसाठी मी सादर केलेला राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र प्रस्ताव मंजूर करण्यासाठी मदत करावी. असा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय राज्यमंत्री तथा शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या प्रभारी रेणुका सिंह यांच्यावर केला.
केंद्रीय मंत्री रेणुका सिंह या गुरुवारी (ता. १५ सप्टेंबर) जुन्नरच्या दौऱ्यावर आल्या होत्या. नारायणगाव येथे झालेल्या मेळाव्यात त्यांनी शिरूरच्या खासदारांना त्यांच्या कार्यालयासमोरील रस्ता नीट करता आला नाही. ते काय मतदारसंघाचा विकास करणार, अशी टीका खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर केली होती. त्या टीकेला खासदार डॉ. कोल्हे यांनी आज उत्तर दिले.
खासदार कोल्हे म्हणाले की, राजकिय भाषणबाजी करणे सोपे असते, प्रश्न सोडवणे अवघड असते. केंद्रीय मंत्री सिंह यांनी टीका करण्याअगोदर प्रश्न समजून घेणे आवश्यक होता. अष्टविनायक महामार्गापैकी राज्य सरकारच्या अखत्यारित असलेला हा रस्ता आहे. कोल्हे मळ्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी या रस्त्यात गेल्या आहेत. स्थानिक भूमिपुत्रांना त्यांचा जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. त्यासाठीचा पंचवीस कोटी रुपयांचा निधीचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रलंबित आहे. त्यामुळे रस्त्याचे काम रखडले आहे. केंद्रीय मंत्री रेणुका सिंह यांनी केवळ राजकारणापोटी टीका करण्यापेक्षा राज्यात त्यांच्या विचाराचे सरकार आहे. त्यामुळे राज्य सरकारला त्यांनी निधी देण्यासाठी तशा सूचना द्याव्यात. स्थानिक भूमिपुत्रांचा हक्क, त्यांचा निधी त्वरित मिळवून देण्यासाठी त्यांनी सहकार्य करावे.
डॉ. कोल्हे म्हणाले की, मी खासदार झाल्यापासून शिरूर लोकसभा मतदारसंघात हजारो कोटी रुपयांची विकासकामे आणली. शिरूरमधील एका खासदाराची विकास कामे पाहून किमान तुमच्या सरगुजा जिल्ह्याला तुम्ही न्याय द्याल. तुमच्या जिल्ह्यातील शाळांची दयनीय अवस्था पाहून येथील विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आहे. तुम्ही शिरूरच्या भविष्याबाबत घोषणाबाजी करण्यापेक्षा त्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा वर्तमानकाळ ठीक करण्यासाठी प्रयत्न करा. असा उपरोधिक सल्लाही डॉ. कोल्हे यांनी केंद्रीय मंत्री सिंह यांना दिला.
जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील आदिवासी बांधवांच्या प्रगतीसाठी मी राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र प्रस्ताव सादर केला आहे. केंद्रात तुमचे सरकार असल्याने हा प्रकल्प मंजूर करण्यासाठी मदत करा. तसेच, खेड, जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागांना जोडणारा नवीन राष्ट्रीय महामार्ग मी मंजूर करून आणला आहे. या रस्त्याला निधी मिळण्यासाठी सहकार्य करा. फक्त अडवाअडवी व जिरवाजिरवीचे राजकारण करून जनतेचे भले होणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.