पिंपरी दि. १५ (पीसीबी) – पिंपरी – चिंचवड शहरातील गृहसंस्थांनी पुढाकार घेतला आहे. शहरातील तब्बल 168 हौसिंग सोसायट्यांमार्फत ओल्या कच-यावर सोसायटीच्या आवारातच प्रक्रीया करून तो जिरवला जात आहे. त्यामुळे संकलीत होणा-या कच-याच्या प्रमाणात घट होण्यास मदत होत आहे.
पिंपरी – चिंचवड शहरात भुमिभरणासाठी जागेची कमतरता असल्याने योग्य माध्यमाद्वारे जैव विघटनशील कच-याचे विघटन केले जाते. यातून मातीसाठी चांगल्या दर्जाचे पोषण मिळते. तसेच समृद्ध आणि पर्यावरणीय अनुकूल खत तयार केले जाते. त्यामुळे मातीची गुणवत्ता आणि उत्पादन क्षमता वाढते. देशातील बहूतांश महापालिका हद्दीतील घनकच-यामध्ये 35 ते 40 टक्के सेंद्रीय घटक आहेत. या कच-याचे विल्हेवाटीच्या सर्वात जुन्या पद्धतीपैकी एक असलेल्या सेंद्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. सेंद्रीय कच-याच्या विघटनातून नैसर्गिक प्रक्रीयेद्वारे खत किंवा कंपोस्ट याचे उत्पादन होते. यामध्ये पोषक द्रव्ये अतिशय समृद्ध असतात.
महापालिकेमार्फत नागरिकांमध्ये कंपोस्टींग बाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे. नागरिकांना मोठ्या गृहसंकुलाद्वारे त्यांच्याच आवारामध्ये ओल्या कच-याची कंपोस्टींगच्या माध्यमातून विल्हेवाट लावण्यास प्रोत्साहित करण्यात येत आहे. महापालिकेच्या प्रयत्नांना नागरिक देखील सकारात्मक प्रतिसाद देत असून शहरातील अनेक इमारती-संकुलामध्ये त्यांच्या आवारातच घनकचरा जिरवला जात आहे.
महापालिकेच्या बांधकाम परवाना विभागामार्फत सन 2021-22 मध्ये सुमारे 168 हौसिंग सोसायट्यांना त्यांच्या आवारातच घनकचरा विल्हेवाट प्रकल्पासाठी परवानगी देण्यात आली आहे. या सोसायट्यांमार्फत ओल्या कच-यावर सोसायटीच्या आवारातच प्रक्रीया करून तो जिरवला जात आहे. त्यामुळे भु-भरण संकलीत होणा-या कच-याच्या प्रमाणात घट होण्यास मदत होत आहे.