उर्से गावातील गाईंना लम्पी आजार, दूध उत्पादन घटण्याची शक्यता

0
255

मावळ, दि. १२ (पीसीबी) : मावळमधील उर्से गावातील वीस जनावरांना लम्पी विषाणूची लागण झाली आहे. या विषाणूचा बाह्य कीटकांद्वारे प्रसार होतो. त्यामुळे शासन नियमानुसार परिसरातील जनावरांच्या लसीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. या विषाणूची लागण झाल्याने जनावरांना ताप येऊन दूध उत्पादन घटण्याची शक्यता असते. जनावरे चाराह खात नाहीत. अशा जनावरांना तापाची औषध देणे आणि लसीकरण करणे आवश्यक आहे. मावळमध्ये जवळपास 52 हजार पशुधन आहे. गाय, बैल यांचे 25 पंचवीस हजार तर म्हैस वर्गातील 26 हजार पशुधन आहे. उर्से गावात या रोगाची जास्त प्रमाणात लागण झाली आहे. दरम्यान, जनावरांचे लसीकरण केल्यानंतर आता पंधरा ते वीस दिवसांत या जनावरांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती तयार होईल, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.

जनावरांमधील लम्पी नावाच्या रोगाने राज्यात हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बळीराजावर पुन्हा मोठे संकट ओढावले आहे. लम्पी हा गाय-म्हशींमधील एक रोग आहे. हा LSD नावाचा विषाणू आहे, जो डास, माशा आणि गोचिडांद्वारे पसरतो. याशिवाय दुषित पाणी, लाळ आणि चाऱ्यातूनही याचा प्रसार होतो.

या आजारात जनावरांच्या शरीरावर गाठी तयार होतात. या गाठी हळूहळू मोठ्या होतात. त्याच्या जखमा तयार होतात. जनावरांना ताप येतो, गाय-म्हशी दूध देणे बंद करतात. गर्भवती जनावरांचा गर्भपात होतो. या रोगात जनावरांचा मृत्यूही होतो.

माणसाला प्रसार नाही
लम्पी हा जनावरांमध्ये होणार आजार आहे. अजूनपर्यंत तरी माणसांमध्ये याचे संक्रमण झाल्याचे कुठलेही प्रकरण नाही. मात्र तरी आजारग्रस्त जनावरांची स्वच्छता केल्यानंतर संबंधित ठिकाण निर्जंतुकाने स्वच्छ करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.