सिलिकॉन व्हॅली येथील जगातील अव्वल दर्जाच्या एक्सलरेशन प्रोग्राम साठी एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे ची निवड

0
337

– अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली व कॅनडामधील कॅलगरी येथे स्टार्टअप प्रशिक्षण सुरू.

कॅलिफोर्निया (अमेरिका), दि. ४ (पीसीबी) : आपल्या कार्याने गेल्या 10 वर्षात सोलापूरकरांना अनेक अभिमानाचे क्षण देणारा एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे याने “सोलापूर ते सिलिकॉन व्हॅली” अशी झेप घेतली असून जगातील टॉपच्या व अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या “500 स्टार्टअप” एक्सलरेशन प्रोग्राम मध्ये त्याची निवड झाली असून जगभरातून फक्त 20 फाउंडर्सना यासाठी निवडले गेले आहे. आनंद सध्या अमेरिकेत हे प्रशिक्षण घेत आहे. गिर्यारोहण, लेखन, कोचिंग पासून आता जागतिक दर्जाचा उद्योजक बनण्यासाठी ही निवड सर्वात मोठी आहे असे आनंदने सांगितले. सोलापूरमधील GM चौकात वडिलांचा 2 चाकी गाड्यांचा पंचर व आउट काढण्याचा व्यवसाय ते आनंदची सिलिकॉन व्हॅली मधील झेप ही प्रत्येक युवकासाठी प्रेरणादायी आहे.

500 ही जगातील सर्वात मोठा एक्सलरेशन प्रोग्राम असून “जगातील सर्वात हुशार उद्योजकांना निवडून त्यांना जगातील सर्वात मोठ्या कंपन्या बनवण्यासाठी ट्रेनिंग देणे” या या प्रोग्राम चा उद्देश असतो. जगातील शेकडो युनिकॉर्न कंपन्यांचे सिलेक्शन याच एक्सलरेशन प्रोग्राम मध्ये झाले होते. त्यापैकी कॅनव्हा, रेडिट, कार्स24 या कंपन्याच्या फाउंडर्सना इथे ट्रेनिंग दिली गेली आहे.

अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली व कॅनडामधील कॅलगरी या 2 ठिकाणी आनंदला हे प्रशिक्षण नोव्हेंबरपर्यंत मिळणार आहे. या 500 एक्सलरेशन प्रोग्राम मध्ये निवड होणे सर्वात कठीण असून स्टॅनफोर्ड, हावर्ड, प्रिन्सटन व येल विद्यापीठात ऍडमिशन मिळवण्यापेक्षा याची निवड प्रक्रिया अवघड आहे.

“सिलिकॉन व्हॅली मधील एक्सलरेशन प्रोग्राम मध्ये निवड होणे माझ्यासाठी स्वप्नवत होते. जगातील फक्त 20 कंपन्यांना निवडून हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत ती पूर्ण होतातच. कोणत्याही कौटुंबिक बिजनेसची पाश्वभूमी नसताना ही संधी मिळवणे माझ्यासाठी आनंददायी आहे”

– आनंद बनसोडे