मोबाईल आणि इंटरनेट हे शिक्षणाचे साधन म्हणून वापरा आणि गुणांपेक्षा अंगभूत गुणवत्तेला महत्त्व द्या

0
208

– प्रा.डॉ.राजेंद्र कांकरिया यांचे रणगाडा डेपो खडकी येथे विद्यार्थी करिअर मार्गदर्शन शिबिरात संबोधन

खडकी, दि. ३० (पीसीबी) – ‘आपण सगळे विद्यार्थी आणि पालक गुणांच्या स्पर्धेत अडकलो आहोत. गुणवत्ता यादीतील विदयार्थी,कमी टक्केवारीत उत्तीर्ण झालेले विदयार्थी आणि पालक यांच्या मनात नेहमीच दहावी,बारावीनंतर काय? याबद्दल अनेक संभ्रम असतात.गुणांच्या ऐवजी अंगभूत गुणवत्तेला महत्व दिले तर आवडीच्या करिअर शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येणार नाही.आता माध्यम ,माहितीच्या क्रांतिकारी युगात मोबाईल आणि इंटरनेट हे शिक्षणाचे साधन आहे,तुम्ही हजारो आधुनिक अभ्यासक्रम शोधू शकता.असे प्रतिभा कॉलेज चिंचवडचे प्राध्यापक आणि करिअर मार्गदर्शक प्रा.डॉ.राजेंद्र कांकरिया यांनी सेंट्रल ए एफ व्ही (रणगाडा)डेपो एम्प्लॉईज को.ऑप.पतपेढीच्या खडकी येथील विद्यार्थी कौतुक समारंभात सांगितले.

ते म्हणाले की, तुमच्या आवडीचे कोणतेही क्षेत्र तुम्हाला यशस्वी बनवते.क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर दहावी नापास होते.त्यांनी आवडीच्या क्षेत्रात जागतिक प्रसिद्धी मिळवली,30 हजार रन काढून त्यांनी जागतिक रेकॉर्ड केले.ते ग्रॅज्युएट असते तर 50 हजार रन काढल्या असत्या.त्यांच्या आईवडिलांनी त्यांना क्रिकेटक्षेत्रात नाव कमावण्याची संधी दिली.चाळीस वर्षांपूर्वी साचेबंद अभ्यासक्रम होते.पैसा,साधनसामग्री ,दळणवळण याची मर्यादित उपलब्धता होती.वैद्यकीय,अभियांत्रिकी कॉलेज पुरेशी नव्हती.आता देशात शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.पुणे,पिंपरी चिंचवड शहरात 600 कॉलेजमध्ये विविध प्रकारचे असंख्य अभ्यासक्रम शिकवले जात आहेत.दहावी बारावी मधील विद्यार्थ्यांना साहित्य,कला,संगीत,देशी आणि परदेशी भाषा,जागतिक व्यापार उदीम,कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, पर्यटन,विमान सेवा ईई विविध क्षेत्रात खूप मोठ्या संधी आहेत. तुमचे करिअर पालकांनी ठरवू नये.दहावी बारावी नंतर चांगले करिअर मार्गदर्शन घेऊन आवडीच्या क्षेत्रात यशस्वी होता येते,असे सांगून ते म्हणाले की सुमारे 3000 वर्षांपूर्वी गुरुकुल होते.सुप्रसिद्ध व्याकरणकार,संस्कृतभाषेचा जगातला सर्वात समर्थ व्याकरणकार म्हणून पाणिनी प्रसिद्ध आहे. त्याने त्या गुरुकुलात अतिशय कठीण काळात संस्कृत साहित्य बांधले आणि म्हणूनच पुढे संस्कृतात सुसंबद्ध रचना तयार झाल्या,तो जागतिक कीर्तीचा व्याकरणकार झाला.

आज तुम्ही तुमच्या आवडीचे अभ्यासक्रम निवडले तर त्यासाठी आर्थिक अडचणी येणार नाहीत परदेशात उच्च शिक्षणासाठी 25 लाख आणि देशात 8 लाख कर्ज बँका देत आहेत,सरकारने शैक्षणिक कर्जासाठी नियम अटी शिथिल केल्या आहेत.दहावी बारावीच्या गुणवंत आणि उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी गटचर्चा करावी,तुमच्या शिक्षकांचे मार्गदर्शन घ्यावे,तुमच्या मनातील आवडते क्षेत्र तुम्ही निवडा, तुम्ही यशस्वी आयुष्यासाठी सुप्रसिध्द व्हाल,असे प्रा डॉ.राजेंद्र कांकरिया यांनी सांगितले.

शिकलेली मुले ही राष्ट्राची अमूल्य संपत्ती आहे-
कमांडंट ब्रिगेडियर एस पी दास

सेंट्रल ए एफ व्ही डेपो(रणगाडा) एम्प्लॉईज पतपेढी आयोजित गुणवंत विद्यार्थी कौतुक समारंभ,खडकी येथे प्रमुख पाहुणे कमांडंट ब्रिगेडियर एस पी दास यांच्या हस्ते पारितोषिके आणि स्मृतिचिन्हे विद्यार्थ्यांना देण्यात आली.
त्यावेळी ते म्हणाले की,

—-देशातील विद्यार्थी नवीन नवीन ज्ञान प्राप्त करत आहेत.अभियांत्रिकी,माहिती,संगणक,वैद्यकीय, संरक्षण क्षेत्रात नवसंकल्पना विकसित करणारी शिक्षण क्षेत्रे या देशात आहेत.पूर्वी अभ्यास कोणता करावा,करिअर कोणते करावे यासाठी मार्गदर्शक उपलब्ध नव्हते.आता खूप काही शिकण्यासारखे आहे.चांगले मार्गदर्शक येथे मुलांना मिळतात.वेगाने बदलत असलेले ज्ञान,विज्ञान,तंत्रज्ञान आत्मसात करणारी आजची शिकलेली पिढी ही राष्ट्राची अमूल्य संपत्ती आहे.या पिढीने संस्कार,शिस्त,वेळेचा सदुपयोग करावा,राष्ट्राची उन्नती करावी,असे कमांडर एस पी दास यांनी सांगितले.

या कौतुक समारंभात सोनाली वाल्मिकी,लोकेश साठे,विश्वेश साठे,मानसी सावळकर, वैष्णवी पाचार्णे,श्रीकांत लोहार,पुष्कर बनकर,स्नेहल खाडे, करण कांबळे, गौरी बोऱ्हाडे, ऋषीकेश लोणकर,आशिष पारधी,रम्या राव,ओम बालवडकर,आसावरी माठे,तन्वी गायकवाड, ओमकार कांबळे या विद्यार्थ्यांचा पारितोषिके देऊन सत्कार करण्यात आला.
सूत्रसंचालन दिनेश भिंताडे, प्रास्ताविक रमेश दीक्षित यांनी केले.लेफ्टनंट कर्नल सी बी जिनिया यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. साथीमोहन होळ कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. सलीम सय्यद,सचिन कांबळे,मोहन कामठे,फिरोज सय्यद,अभिनंदन गायकवाड,हेमंत काकडे,नंदकुमार बालवडकर ई प्रमुख पदाधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते.