महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची तडकाफडकी बदली; शेखर सिंह नवे आयुक्त..

0
547

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – राज्यातील सत्ता बदल होताच पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांची अखेर आज (मंगळवारी) तडकाफडकी बदली झाली आहे. त्यांच्या जागी शेखर सिंह यांची नियुक्ती झाली.ओडिशा केडरचे 2005 च्या बॅचचे आयएएस राजेश पाटील यांची आंतरराज्य प्रतिनियुक्तीने पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तपदी 15 फेब्रुवारी 2021 रोजी नियुक्ती झाली. पाटील प्रतिनियुक्तीने 5 वर्षासाठी महाराष्ट्रात आले आहेत. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात पाटील यांची नियुक्ती झाली होती. आयुक्त पाटील यांचे सुरुवातीपासून तत्कालीन सत्ताधारी भाजपशी खटके उडत होते. आयुक्त मनमानी, हुकुमशाह प्रमाणे कारभार करत असल्याचे आरोप झाले होते.

आयुक्त पाटील हे अजित पवार यांच्या कलानुसार कारभार करत असल्याचे आरोप झाले. आयुक्तांच्या कार्यशैली चुकीचे असल्याचे आरोप भाजपकडून झाले. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर आयुक्तांची बदली होणार हे जवळपास निश्चित होते. अखेर आज आयुक्त पाटील यांच्या बदलीचा आदेश महापालिकेत धडकला आहे. आयुक्त पाटील यांची महापालिकेतील अल्प कारकिर्दे विविध कारणांनी वादग्रस्त ठरली.