ईडी कारवाईमुळे हादरलेल्या खासदार भावना गवळींची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी

0
422

नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) – सुमारे १०० कोटींच्या मनी लॉन्ड्रींगमुळे ईडीच्या रडारवर असलेल्या लोकसभेतील शिंदे गटाच्या मुख्य प्रतोद खासदार भावना गवळी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राखी बांधली आहे. देशभरात रक्षबंधन साजरे होत असताना मोदी यांच्यासाठी पाकिस्तानातून त्यांची मानलेली बहिण राखी पाठवते, मात्र सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा गवळी यांच्या रक्षाबंधनाची आहे.

खरंतर, मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात शिवसेनेच्या वाशिमच्या खासदार भावना गवळी यांचे निकटवर्तीय सईद खान यांना सक्तवसुली संचालनालयानं अटक केली. ‘एएनआय’नं यासंदर्भातील वृत्त दिलं होते. सईन खान याच्या चौकशीनंतर थेट गवळी यांनी ईडीने नोटीस पाठवल्याने एकच खळबळ उडाली होती. नंतरच्या काळात ईडी ची संभाव्य अटक टाळण्यासाठी भावना गवळी यांनी शिवसेनेला रामराम करत शिंदे गटात प्रवेश केला.

१०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप –
खासदार भावना गवळी यांच्या बालाजी पार्टिकल बोर्ड कारखान्यात १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात ईडीनं गवळी यांच्याशी संबंधित असलेल्या यवतमाळ व वाशिम येथील पाच संस्थांवर याआधीच छापे टाकले होते. वाशिम-यवतमाळ येथे टाकलेल्या छाप्यांमध्ये ईडीने येथून अनेक कागदपत्रे जप्त केली होती. भावना गवळीशी संबंधित पाच संस्थांच्या अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात आली होती. त्याशिवाय, गवळी यांच्या एका संस्थेच्या कार्यालयातून ७ कोटी रुपये चोरीला गेल्याची तक्रार स्वत: गवळी यांनी केली होती.

या तक्रारीनंतर भाजपानेते किरीट सोमय्या यांनी गवळी यांच्यावर निशाणा साधला होता. इतके पैसे गवळी यांच्याकडं आले कुठून, असा सवाल त्यांनी केला होता. तसंच, चौकशीची मागणीही केली होती. तेव्हापासून गवळी ईडीच्या रडारवर असून त्यांच्यावर झालेल्या आरोपांची शहानिशा ईडीकडून केली जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट करुन या शुभेच्छा दिलेल्या आहेत. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण भावाला राखी बांधते आणि त्याने आपल्या संरक्षणासाठी सदैव तत्पर असावं आणि त्याला दिर्घायुष्य प्राप्त व्हावं अशी प्रार्थना करते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्षाबंधनानिमित्त अनेक ठिकाणांहून त्यांच्या बहिणी प्रेमापोटी राखी पाठवत असतात. कोरोनाचं संकट उद्भवण्यापूर्वी राजधानी दिल्लीत पंतप्रधान मोदी हे अनेक छोट्या मुलींकडून राखी बांधून घेत असत. मात्र, मागील दोन वर्षांपासून कोरोनाचं संकट कायम असल्याने हा समारंभ झालेला नाही.