संजय राठोड प्रकरणावरून आता लता एकनाथ शिंदे आणि अमृता देवेंद्र फडणवीस यांना आवाहन

0
249

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – एका मुलीवर अत्याचार करून आत्मत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या मंत्री संजय राठोड मुळे शिंदे मंत्रीमंडळ अडचणीत आले आहे. महाराष्ट्रातील महिला संघटना, महिला कार्यकर्त्यांनी राठोड विरोधात जोरदार मोहिम उघडली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनाच आवाहन केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गट आणि भाजपा सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार सत्ता स्थपानेनंतर ३९ दिवसांनी पार पडला. या शपथविधी सोहळ्यामध्ये पूजा चव्हाण प्रकरणातील वादग्रस्त शिवसेना आमदार संजय राठोड यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पत्नी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीचा उल्लेख करत टीका केली आहे.

मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर अंजली दमानिया यांनी ट्विटरवरुन संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांची नावं मंत्रिमंडळात पाहून वाईट वाटल्याचं म्हटलं होतं. “दोन नावं बघून खूप वाईट वाटलं. संजय राठोड? अशा माणसाला मंत्रीपद कसं देऊ शकतात? अब्दुल सत्तार? यांना मंत्रीपद द्यायची इतकी घाई का? घोटाळ्याची चौकशी तर होऊ द्यायची होती. परत ये रे माझ्या मागल्या सुरू. एका माळेचे मणी”, असं दमानिया यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

या ट्विटनंतर काही तासांनी दमानिया यांनी थेट मुख्यमंत्री शिंदेंच्या पत्नी लत्ना शिंदे आणि फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा उल्लेख करत राठोड यांच्या मंत्रीपदावरुन ट्विट केलं. “संजय राठोड यांना मंत्री बनवलं यावर मीडियाने सौ. लता एकनाथ शिंदे व अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया घेतली पाहिजे. खरं तर अशी किळसवाणी लोकं राजकारणात राहूच दिली नाही पाहिजे. सगळ्या स्त्रियांनी मिळून याचा तीव्र निषेध करायला हवा,” असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय.
अन्य एका ट्विटमध्ये अंजली दमानिया यांनी एकनाथ शिंदे यांना नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपटातील एका प्रसंगावरुन टोला लगावला आहे. “मुख्यमंत्री शिंदे, आनंद दिघे यांचे शिष्य न तुम्ही? त्यांचा हयातीत, तुम्ही अशा एका माणसाचे काय केले हे दाखवलं ते फक्त पिक्चर पूर्त होतं का?” असा प्रश्न अंजली दमानियांनी उपस्थित केलाय.

‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटामधील कथानकामध्ये बलत्कार झाल्यानंतर आत्महत्या केलेल्या एका तरुणीने आई-वडील आनंद दिघेंकडे न्याय मागण्यासाठी येतात त्यावेळी आनंद दिघेंसोबत काम करणारे एकनाथ शिंदे संतापून या बलात्काऱ्याला धडा शिकवण्यासाठी हॉकी स्टीक घेऊन धावून जाताना दाखवण्यात आलेत. याच प्रसंगावरुन हा टोला दमानिया यांनी लगावला आहे.