देहूरोडच्या नागरिकांची मागणी मुख्यंत्र्यांना सांगू : चंद्रकांत पाटील

0
300

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड रद्द करून नगरपरिषदेची स्थापना करा नागरिकांची मागणी

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डचे प्रशासन येथील स्थानिक नागरिकांना पाणी, आरोग्य यासारख्या प्राथमिक सुविधा देखील पुरवू शकत नाही. त्यामुळे देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड बरखास्त करून येथे देहूरोड नगर परिषदेची स्थापना करावी अशी मागणी नागरिकांच्या शिष्टमंडळाने भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.

अल्पसंख्यांक आयोगाचे माजी अध्यक्ष व भाजप प्रणित नवभारतीय शिव वाहतूक संघटना राष्ट्रीय अध्यक्ष हाजी अराफत शेख यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत रंगशारदा सभागृहात हर घर तिरंगा अभियान कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी आ. चंद्रकांत पाटील, यावेळी माजी मंत्री अर्जुन खोतकर, माजी आमदार आशिष शेलार, नितेश राणे, अभिमन्यू पवार, वाहतूक संघटनेचे कार्य अध्यक्ष मंगेश सांगळे, सिने अभिनेत्री व महिला कार्याध्यक्ष इशा कोपीकर यांना संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी अराफत शेख, उपाध्यक्ष सागर लांगे, देहूरोड काँटोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष रघुवीर शेलार, दीपक वाल्हेकर, विलास शिंदे, धीरज नायडू, दिनेश सिंग, प्रवीण आखाडे यांनी निवेदन दिले.

या निवेदनात म्हटले आहे की, देहू रोड कॅन्टोन्मेंट बोर्डाची स्थापना 1960 साली झाली. सद्यस्थितीत देहू रोड ची लोकसंख्या 50,000 पेक्षा जास्त आहे. केंद्र सरकारचा तुटपुंजा निधी मिळत असल्यामुळे बोर्डाच्या वतीने येथील नागरिकांना जीवनावश्यक पाणी पुरवठा, आरोग्य, स्वच्छता, साफसफाई, सुरक्षा, दिवाबत्ती, शाळा, उद्यान अश्या प्राथमिक सुविधा देखील बोर्ड पुरवू शकत नाही. बोर्डाचा प्रशासकीय कारभार बोर्डाचे सीईओ आणि उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली चालतो. पूर्वी बोर्डाला जकातीमधून उत्पन्न मिळत होते. काही वर्षांपूर्वीच जकात बंद झाल्यामुळे आता बोर्ड येथील नागरिकांना निधी अभावी प्राथमिक सुविधा देखील सक्षमपणे पुरवू शकत नाही. तसेच बोर्डाच्या कामगारांचे पगार देखील वेळच्यावेळी नियमितपणे देवू शकत नाही. त्यामुळे येथील नागरिकांना दिलासा देण्यासाठी देहूरोड नगरपरिषदेची स्थापना करावी अशी मागणी मागील सहा महिन्यांपासून पासून येथील सर्वपक्षीय नागरिक, सर्व पक्षाचे पदाधिकारी, विविध सामाजिक संघटना, संस्था करीत आहेत. यासाठी युवा कार्यकर्ता सागर लांगे यांनी येथील नागरिकांना बरोबर घेऊन खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके यांना देखील निवेदन दिले आहे.

या शिष्टमंडळाशी बोलताना आ. चंद्रकांत पाटील यांनी आश्वासन दिले की, या विषयासंदर्भात लवकरच आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून देहूरोड बोर्डाचे नगर परिषदेमध्ये रूपांतर करण्यासाठी सकारात्मक पाठपुरावा करू असे आश्वासन दिले.या कार्यक्रमात अध्यक्ष हाजी अराफत शेख यांच्या पुढाकारातून टॅक्सी, रिक्षा, वाहतूकदारांना छत्री आणि राष्ट्रध्वज वाटप करण्यात आले अशी माहिती सागर लांगे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.