…यांच्या बापजाद्यांनी ५० खोकी पाहिलीत काय ?

0
237

जळगाव, दि. ८ (पीसीबी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या तब्बल ४० आमदारांसह बंडखोरी केल्यानंतर या आमदारांवर विविध आरोप करण्यात आले. बंडखोरीसाठी या आमदारांना प्रत्येकी ५० कोटी रुपये देण्यात आल्याचा दावा महाविकास आघाडीतील काही नेत्यांकडून करण्यात आला होता. याच दाव्याचा पुनरुच्चार करत राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांनी बंडखोरांवर खरमरीत टीका केली आहे.

मुक्ताईनगर येथे रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना खडसे यांनी नव्या सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ‘यांच्या बापजाद्याने कधी ५० खोके पाहिले नसतील. तुम्हाला काय हाटील, काय झाडी जे काही बघायचे असेल ते बघा. मात्र जनतेला वाऱ्यावर सोडू नका,’ असं सांगत एकनाथ खडसेंनी शिंदे सरकारकडून लोकशाहीची टिंगल केली जात असल्याचं म्हटलं आहे.
‘मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पोरखेळ’

राज्यात नवं सरकार स्थापन होऊन महिनाभराचा कालावधी उलटल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आलेला नाही. याबाबत बोलताना खडसे म्हणाले की, ‘एक मुख्यमंत्री तर दुसरा बिनखात्याचा उपमुख्यमंत्री आहे. मंत्रिमंडळ विस्तारावरून गेल्या ३७ दिवसांपासून सरकारचा पोरखेळपणा सुरू आहे,’ अशा शब्दांत त्यांनी सरकारला फटकारलं आहे.
दरम्यान, एकनाथ खडसे यांनी केलेल्या या टीकेला आता शिंदे गट आणि भाजपकडून कशा प्रकारे उत्तर दिलं जातं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.