पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – विधानसभेचे विरोधी नेते अजित पवार आज शिंदे- फडणवीस सरकारवर चांगलेच भडकले. मंत्रीमंडळ विस्तार, सचिवांना अधिकाऱ देण्याच्या निर्णयावर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कठोर शब्दांत प्रहार केला. यांनी लोकशाहिचा मुदडा पाडला, खून केला अशा शेलक्या शब्दांत त्यांनी समाचार घेतला.
पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. महाआघाडीचे सरकार पडल्यानंतरही कार्यकर्त्यांचे आकर्षन अजित पवार असल्याचे आज दिसले. प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह हाऊसफूल्ल झाले होते. यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी महापौर आझमभाई पानसरे, भाऊसाहेब भोईर, संजोग वाघेरे, अपर्णा डोके, वैशाली घोडेकर, शमिम पठाण, वैशाली काळभोर, राजू मिसाळ नाना काटे, प्रदेश प्रवक्ते रविकांत वरपे, महिलाध्यक्षा कविता आल्हाट, माजी नगरसेवक जगदिश शेट्टी, समिर मासुळकर, विनोद नढे, पंकज भालेकर यांच्यासह सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थि होते.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात अजित पवार म्हणाले, राज्यात मोठ्या प्रमाणात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या आहे. याकडे लक्ष देण्यासाठी सरकारमधील कोणालाही वेळ नाही. मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्याच्या सचिवांना अधिकार देण्याचे आदेश काढले. हे आदेश ४ ऑगस्टचे आहे. ही अवस्था आहे. जिल्हा परिषदा, महापालिकांच्या मुदती संपल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून जे काही संविधान, कायदा, नियम केले, त्यातून भारत एकसंध राहिला आहे. मात्र इथं निवडणुका होऊ दिल्या जात नसल्याची खंत अजित पवार यांनी व्यक्त केली.
पवार पुढं म्हणाले की, कोर्टाने सांगितंल की, निवडणुका घ्या. काही जण म्हणतात यांना फेब्रुवारीमध्ये निवडणुका घ्यायच्या. पिंपरी महापालिका, पुणे महापालिका आणि पुणे जिल्हा परिषदेत जागा वाढल्या होत्या. त्या कमी करण्याचा निर्णय घेतला. तुम्ही दोघांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व्हायचं. बाकीच्यांना प्रतिनिधीत्व द्यायच नाही. तिथं अधिकार सचिवांना द्यायचे. हे कस जमणार, तुम्ही लोकशाहीचा मुडदा पाडला, खून केला आहे, असे म्हणते अजित पवार यांनी संताप व्यक्त केला.
माणुसकीला काळिमा फासणाऱ्या गोष्टी घडत आहेत –
“मावळमध्ये नराधमाने बलात्कार केला. त्यानंतर पीडितेचा गळा कापला. त्या निष्पाप मुलीला जगातून जावं लागलं. या सगळ्यावर चाप ठेवायला मंत्रीमंडळ असले पाहिजे, हे बघायचं कोणी? माणुसकीला काळिमा फासणाऱ्या गोष्टी घडत आहेत. दररा असला पाहिजे. प्रशासनातील कमांड असली पाहिजे. या करिताच यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली का?” असा सवालही अजित पवार यांनी यावेळी केला.
अजित पवार म्हणाले, सत्ता असो नसो जनतेचे काम करत राहिले पाहिजे हीच पवार साहेबांची शिकवण आहे. पक्षाची ध्येय धोरणे कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहचवायची आहेत. महाविकास आघाडी सरकार पाडण्यात आले आणि महाराष्ट्र अस्थिर करण्यात आला. शिंदे एकटेच आहेत, देवेंद्र फडणवीस हे आता बिनखात्याचे मंत्री आहेत, राज्याला त्याचा काही उपयोग नाही. लोकांच्यातून नगराध्यक्ष करायचा तर महापालिकेत महापौर लोकांमधून होऊ द्या, असे म्हणत पवार यांनी शिंदे-फडणवीस यांनी ठणकावले. शाहू – फुले – आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हे चालणार नाही, असा इशारा दिला.
तीनचा की चारचा प्रभाग राहिल हे आता काही सांगता येत नाही. लोक कोर्टात गेलेत. जर का कोर्टाला मुद्दा पटला तर निवडणुका केव्हाही लागतील, गहाळ राहू नका. निवडणुकीचा बदलता ट्रेंड लक्षा घ्या. प्रत्येक वार्डात सूक्ष्म नियोजन झालेच पाहिजे, अशी सुचना पवार यांनी केली.
रिसोर्स टीम तयार करा. वार्ड रचनेचा अभ्यास असलेले लोक घ्या. वार्डातील बलस्थाने, कमकूवत बाजू याचा विचार केला पाहिजे. पक्ष कुठे कमकूवत आहे तिथे वेगळे नियोजन करा. जिथे मजबूत आहोत तिथे स्वतंत्र नियोजन करा. कुणाच्या बरोबर युती आघाडी करायची ते राज्यात ठरवले जाईल. मी बारामतीचा लोकप्रतिनीधी होतो, पण या शहराला मी आयुष्यात कधीही विसरु शकत नाही, असेही पवार म्हणाले.
२०१७ त्या पराभवाचे शल्य आजही पवार यांना आहे. ते म्हणाले, शहर विकासाचे काम फक्त राष्ट्रवादीच करु शकते. २०१७ मध्ये विरोधकांनी आपल्या विकास कामापेक्षा बदनामीचे काम पध्दतशीर केले आणि त्यांना त्यात यश मिळाले. गेल्या पाच वर्षांत करदात्यांच्या पैशावर त्यांनी कसा डल्ला मारण्याचे काम केले ते लोकांनी पाहिले. सुसज्ज रस्ते स्मार्ट सिटीच्या नावाखाली अरुंद करण्याचे काम केल्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. केवळ स्मार्ट सिटीच्या नावाखाली पैसे खर्च करण्याचा सपाटा लावला, अशी टीका पवार यांनी केली.
सत्ता राष्ट्रवादीचीच येणार – अजित गव्हाणे
शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले, प्रभाग तीन चा होऊ चारचा होऊ देत महापालिकेत सत्ता राष्ट्रवादीचीच येणार, महापौर राष्ट्रवादीचाच होणार. महापालिकेतील अधिकाऱ्यांची कुचंबना होते आहे. पाच वर्षे भाजपाने प्रचंड असा भ्रष्टाचार केला. भाजपाने हे शहर अधोगतीकडे नेले आहे.
दादा, तुम्ही चुकिच्या माणसांना मोठे केले – भोईर
भाऊसाहेब भोईर म्हणाले, अजित पवार पिंपरी चिंचवड मधून गेल्यापासून शहराची वाताहत झाली. असं काय भाजपाने कार्य केले तर लोकांनी भाजपाने भरभरून मते दिली याचा विचार केला पाहिजे. दादा आज सांगतो, त्याचे कारण तुम्ही चुकिच्या माणसांना त्यांच्या उंचीपेक्षा खूप मोठे केले. आपलेच लोक गेली तिकडे. जिथे या शहरात भाजपाचे तीन नगरसेवक यायचे तिथे त्यांची सत्ता आली. आपण आत्मचिंतन करण्याची गरज आहे.
रविकांत वरपे यांनी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी आखाडात दिलेल्या मटन पार्टीचा उल्लेख करुन खरपूस शब्दांत शिंदे- फडणवीस सरकारचा समाचार घेतला.
कविता आल्हाट म्हणाल्या, महाआघाडी सरकार गेले, पण भाजपा जनतेच्या मनातून उतरली आहे.पुन्हा महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल. विजय लोखंडे, विनायक रणसुंभे, शिवाजी पाडुळे, वर्षा जगताप, कविता खराडे यांनीही मनोगत व्यक्त केले.