महापालिका उद्यापासून क्षेत्रीय कार्यालयात नागरिकांना विकणार राष्ट्रध्वज..

0
203

पिंपरी दि. २ (पीसीबी) – भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशभर राबविण्यात येत असलेल्या हर घर तिरंगा उपक्रमासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका तीन लाख कापड-पॉलिस्टरचे राष्ट्रध्वज विकणार आहे. एका राष्ट्रध्वजाची किंमत 24 रुपये आहे. उद्या (मंगळवार) पासून आठही क्षेत्रीय कार्यालयात नागरिकांना राष्ट्रध्वज मिळणार आहे.

भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर 11 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे “हर घर तिरंगा” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात प्रत्येक नागरिकांच्या घरांवर तसेच सर्व शासकीय आणि निमशासकीय आस्थापना, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूर्तीने करण्यासाठी जाणीव जागृती कार्यक्रमाचे नियोजन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

देशभरात एकाचवेळी हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यात येणार आहे. एकाच वेळी नागरिकांना राष्ट्रध्वज उपलब्ध होईल की नाही याबाबत शंका आहे. त्यामुळे महापालिकेच्या भांडार विभागाच्या वतीने शहरातील नागरिकांसाठी 3 लाख कापड-पॉलिस्टर राष्ट्रध्वज खरेदी करण्याचे प्रायोजन केले.  राष्ट्रध्वजाची रूंदी 20 इंच, उंची 30 इंच या साईजमध्ये असणार आहे.  यासाठी 54 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. केंद्र सरकारच्या आदेशामुळे महापालिका राष्ट्रध्वज खरेदी करून नागरिकांना विकणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने खरेदी करण्यात येणारे तीन लाख राष्ट्रध्वज महापालिका नागरिकांना विकणार आहे. हे ध्वज खरेदी केलेल्या किंमतीमध्ये विकण्यात येणार आहेत. एका ध्वजाची किंमत 24 रुपये असणार आहे. यासाठी पालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयात ध्वज विक्री स्टॉल लावण्यात आले आहेत.