अजित गव्हाणे, मंगला कदम, वैशाली घोडेकर, सिमा सावळे, नितीन काळजे, एकनाथ पवार, राहुल जाधव या दिग्गजांना पुन्हा मोठी संधी

0
888

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – आरक्षण सोडतीमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेतील काहींना धक्का तर काहींना सुटकेचा निश्वास सोडला आहे. या आरक्षण सोडतीमुळे माजी महापौर मंगला कदम, वैशाली घोडेकर, अपर्णा डोके, नितीन काळजे, राहुल जाधव, माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे, ज्येष्ठ नगरसेवक अजित गव्हाणे, भाऊसाहेब भोईर आदींना पुन्हा सभागृहात येण्याची संधी आहे. तर, अनेकांना पुन्हा सभागृहात येण्याचा मार्ग आरक्षणातून खुला झाला आहे. आरक्षण सोडत निघताच इच्छुकांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले यांची संधी गेली. माजी महापौर योगेश बहल यांच्यावर हक्काचा मतदार असलेला प्रभाग बदलून दुस-या प्रभागातून लढावे लागणार आहे. तर, महापौर उषा ढोरे, उपमहापौर हिराबाई घुले, सभागृह नेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांना पुन्हा सभागृहात येण्याची संधी आहे.

आगामी निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत आज (शुक्रवारी) चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात काढण्यात आली. आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उपायुक्त विठ्ठल जोशी, सचिन ढोले, सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर, प्रशांत जोशी, उपस्थित होते. नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसींच्या 24 जागा थेटपणे नेमून दिल्या. 13 जागांसाठी सोडत काढली. त्यातील महिलांसाठीच्या 7 जागा थेटपणे दिल्या तर 12 जागांसाठी सोडत काढली. सर्वसाधारण महिलांसाठी 31 जागा थेटपणे दिल्या. 7 जागांसाठी सोडत काढली.
माजी उपमहापौर केशव घोळवे, स्थायी समितीचे माजी सभापती संतोष लोंढे, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांचे पुत्र सिद्धार्थ बनसोडे, राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटे, भाजप नगरसेवक शैलेश मोरे, शितल शिंदे, शशिकांत कदम, भाजप नगरसेविका अश्विनी बोबडे, सुवर्णा बुर्डे, नम्रता लोंढे यांची संधी गेली आहे. आरक्षण सोडतीमुळे योगेश बाबर, अमित बाबर, जगदिश शेट्टी, उल्हास शेट्टी, प्रसाद शेट्टी यांचीही संधी हुकली आहे.

काहींना प्रभाग बदलावा लागणार किंवा आमने-सामने लढण्याची वेळ
सर्वसाधारण एकच जागा असल्याने राष्ट्रवादीचे नगरसेवक नाना काटे आणि भाजपचे नगरसेवक बापू काटे यांना प्रभाग बदलावा लागेल किंवा आमने-सामने लढावे लागेल. राष्ट्रवादीचे स्थायी समितीचे माजी सभापती प्रशांत शितोळे-अतुल शितोळे यांना आमने-सामने लढावे लागणार आहे. काही नगरसेवकांवर प्रभाग बदलण्याची वेळ येणार आहे. सध्या एकाच पक्षात असलेल्या अनेक विद्यमान नगरसेवकांना आमने-सामने लढावे लागणार आहे.

सौभाग्यवती, मातोश्रींना निवडणूक रिंगणात उतरावे लागणार
आरक्षण सोडतीत अनेक विद्यमान नगरसेवकांना धक्का बसला आहे. महिलांसाठी आरक्षण पडले आहे. हक्काचा मतदार असलेल्या प्रभागात आरक्षण पडल्याने अडचण झाली. बाजूच्या प्रभागात लढणे अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळे अनेक नगरसवेकांना कुटुंबातील व्यक्तीला संधी द्यावी लागणार आहे. सौभाग्यवती किंवा मातोश्रीला निवडणुकीच्या राजकारणात आणावे लागणार आहे.