महागाई विरोधात घोषणा दिल्याने काँग्रेसच्या चार खासदारांचे निलंबन

PCB Admin
1 Min Read

नवी दिल्ली, दि. २५ (पीसीबी) : लोकसभेत फलक घेऊन महागाईविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या काँग्रेसच्या 4 खासदारांना सभागृहातून निलंबित करण्यात आले आहे. काँग्रेस खासदार मणिकम टागोर, ज्योतिमणी, रम्या हरिदास आणि टीएन प्रतापन यांना संपूर्ण पावसाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. तर, दुसरीकडे लोकसभेचे कामकाज 26 जुलै सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

नियम 374 अन्वये काँग्रेसच्या चार खासदारांना अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले आहे. तत्पूर्वी, विरोधी खासदारांनी सोमवारी सभागृहात घोषणाबाजी आणि फलक दाखवून महागाई, स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात वाढ या मुद्द्यांवर केंद्राशी चर्चा करण्याची मागणी केली. यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांना फटकारले आणि सभागृहाची प्रतिष्ठा राखण्यास सांगितले. ओम बिर्ला म्हणाले, “हे लोकशाहीचे मंदिर आहे, सभागृहाची प्रतिष्ठा राखणे ही सदस्यांची जबाबदारी आहे. सरकार चर्चेसाठी तयार आहे.”

“तुम्हाला चर्चा करायची असेल तर मी त्यासाठी तयार आहे, पण तुम्हाला सभागृहात फक्त फलक दाखवायचे असतील तर तुम्ही दुपारी 3 नंतर सभागृहाबाहेर करू शकता. देशातील जनतेला सभागृह हवे आहे. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी सभागृहात फलक घेऊन आलेल्या कोणत्याही खासदाराला कामकाजात भाग घेऊ दिला जाणार नाही अशी ताकीद दिली. मात्र, यानंतरही विरोधकांचा गोंधळ सुरूच होता. त्यामुळे काँग्रेसच्या चार खासदारांना अधिवेशनाच्या उर्वरित कामकाजासाठी निलंबित करण्यात आले.

Share This Article