सोलापूरात शिवसैनिक शिंदे गटात जायच्या तयारीत

0
380

सोलापूर, दि. २५ (पीसीबी) : राज्यात राजकीय घडामोडी होऊन शिवसेनेत मोठी बंडखोरी झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि भाजपच्या सोबतीने शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे बदललेल्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेपाठोपाठ काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचीही काही नेते मंडळी भाजप वा एकनाथ शिंदेप्रणीत शिवसेनेत जायला उत्सुक असल्याचे सोलापूर जिल्ह्यात दिसून येते.

मागील २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सोलापुरात प्रामुख्याने राष्ट्रवादीला गळती होऊन त्यात बार्शीचे जुने शरदनिष्ठ नेते, माजी मंत्री दिलीप सोपल, करमाळ्याच्या रश्मी बागल, सांगोल्याचे माजी विधान परिषद सदस्य तथा राष्ट्रवादीचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे व इतर काही जणांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीनंतर फक्त दीपक साळुंखे हे एकटेच पुन्हा राष्ट्रवादीत परतले होते. त्या वेळी पक्षाच्या पडत्या काळात मोहोळचे माजी आमदार राजन पाटील-अनगरकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम साठे ही मोजकीच मंडळी शरद पवार यांच्या पाठीशी उभी राहिली होती. त्यानंतर राज्यात राजकीय परिस्थिती बदलून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची महाविकास आघाडी सत्तेवर आली, तेव्हा सांगोल्याचे दीपक साळुंखे हे एकटेच राष्ट्रवादीत परतले. आता पुन्हा राज्यात राजकीय घडामोडी घडल्यानंतर राष्ट्रवादीसह काँग्रेस व शिवसेनेला मोठा फटका बसण्याची चिन्हे दिसत आहेत.

मोहोळचे शरदनिष्ठ नेते राजन पाटील-अनगरकर हे आपल्या मुलांसह राष्ट्रवादींतर्गत साठमारीच्या राजकारणाला कंटाळून भाजपच्या वाटेवर आहेत. भाजपनेही जिल्ह्यात शिल्लक राहिलेल्या राष्ट्रवादीच्या मोहोळ आणि माढा या दोन्ही गडांवर लक्ष केंद्रित केले आहे. राजन पाटील यांची मानसिकता भाजपच्या बाजूने झुकलेली असताना तिकडे माढ्याचे ज्येष्ठ आमदार तथा साखर सम्राट बबनराव शिंदे यांनाही गळाला लावण्याचा प्रयत्न भाजपने चालविला आहे. आमदार शिंदे व त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांचे खासगी आणि सहकारी साखर कारखानदारीचे मोठे जाळे आहे. यातीलच काही अनियमितीकरणावरून त्यांना अलीकडेच केंद्रीय सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नोटीस बजावली आहे. सध्या आपली शरदनिष्ठा कायम असल्याचा दावा रणजितसिंह शिंदे करतात, तर दुसरीकडे माढा तालुक्यात भाजपने आमदार शिंदे यांना जेरीस आणण्याचे ठरविलेले दिसते.

अक्कलकोट तालुका भाजपचा मजबूत गड मानला जातो. काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे हे मागील विधानसभा निवडणुकीतच काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजप प्रवेशाच्या मानसिकतेत होते. परंतु त्यासाठीचे राजकीय गणित जमले नाही म्हणून म्हेत्रे यांना नाइलास्तव काँग्रेसमध्येच राहावे लागले. आता मात्र त्यांचे निष्ठावंत सहकारी महिबूब राजेभाई मुल्ला आणि विलास गव्हाणे या दोन्ही माजी सभापतींनी भाजपची वाट पकडली आहे. तशी भूमिका दोघांनी जाहीर केली आहे. अक्कलकोटमध्ये काँग्रेसला गळती लागल्यास भाजपसमोर विरोधकांचे आव्हानच शिल्लक राहणार नाही, असे दिसते.

पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप ब्रह्मदेव माने यांनी मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेत प्रवेश करून पुन्हा विधानसभेत जाण्याचे मनसुबे रचले होते. ते यशस्वी झाले नाहीत. त्यामुळे आता माने हे चलबिचल झाले आहेत. दिलीप सोपल, रश्मी बागल यांचेही शिवसेनेतील अस्तित्व शोधावे लागत आहे. करमाळ्याचे शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांच्यासमोर एकनाथ शिंदेप्रणीत शिवसेना किंवा भाजपमध्ये जाण्याचे दोन पर्याय आहेत. त्यांचा बोलावता धनी भाजपचे नेते आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील हे मानले जातात. सोलापूर शहरातही शिवसेना आणि राष्ट्रवादीत फाटाफूट होण्याची चिन्हे दिसत आहेत. विशेषतः काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी जवळपास राजकीय निवृत्ती घेतली असताना त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांचीही पक्षांतर्गत अस्वस्थता वाढली आहे.