“आशयगर्भता हा अति लघू कथेचा गाभा!” – राजन लाखे

0
344

पिंपरी,दि. २५ (पीसीबी) “आशयगर्भता हा अति लघू कथेचा गाभा असतो. त्यातील कथन हे गर्भित असते!” असे विचार महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे यांनी घारेशास्त्री सभागृह, श्रीधरनगर, चिंचवड येथे रविवार, दिनांक २४ जुलै २०२२ रोजी व्यक्त केले. निलय मित्रसंस्था (पिंपरी-चिंचवड) आयोजित आणि मयूरेश देशपांडे लिखित ‘अल्याड-पल्याड’ या अलक (अति लघू कथा) संग्रहाचे प्रकाशन करताना राजन लाखे बोलत होते. ज्येष्ठ कवी म. भा. चव्हाण, रघुनाथ पाटील, राजेंद्र वैशंपायन यांची व्यासपीठावर तसेच ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कंक, रेडिओ जॉकी जगदीश यांच्यासह शहरातील साहित्यिक, आप्तेष्ट, मित्रपरिवार आणि रसिकांची सभागृहात उपस्थिती होती. यावेळी म. भा. चव्हाण यांनी, “साहित्यप्रकार छोटा अथवा मोठा असला तरी त्यातील अभिव्यक्ती माणूस वाचणारी असावी. साहित्यिक अथवा कोणताही महापुरुष वैयक्तिक जीवनात कसा वागतो यांवर त्याच्या व्यक्तिमत्त्वाची उंची कळते!” असे मत व्यक्त केले.

रघुनाथ पाटील यांनी, “मराठी साहित्यामध्ये अनन्यसाधारण महत्त्वाचा असलेला कथा हा प्रकार आता अलक (अति लघू कथा) पर्यंत येऊन पोहचला आहे. जगाकडे पाहण्याची सूक्ष्म दृष्टी अन् त्याला मिळालेली अनुभवाची जोड यांमधून परिणामकारक ‘अलक’ निर्मिती होते!” असे लेखनाचे मर्म सांगितले. मराठी साहित्यात अलक रुजविण्याचे श्रेय ज्यांना जाते त्या राजेंद्र वैशंपायन यांनी, “मयूरेश देशपांडे यांच्या आशयसंपन्न अलक म्हणजे जणू सुगंधी मोगऱ्याच्या कळ्या आहेत!” असे गौरवोद्गार काढले. याप्रसंगी रेडिओ जॉकी जगदीश यांनी ‘अल्याड-पल्याड’ या संग्रहातील निवडक अलक सादर केले.

या प्रसंगाचे औचित्य साधून शब्दधन काव्यमंचचा ‘छावा काव्य पुरस्कार २०२२’ यासाठी मयूरेश देशपांडे यांची निवड करण्यात आल्याचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी जाहीर केले. मयूरेश देशपांडे यांनी आपल्या कृतज्ञतापर मनोगतातून, “अलक या साहित्यप्रकाराने मला साहित्यक्षेत्रांत ओळख दिली; तसेच मनाला उभारी दिली. माझ्या लेखनाच्या वाटचालीत कुटुंबीय, मित्रपरिवार यांची प्रेरणा मला खूप मोलाची वाटते!” अशा भावना व्यक्त केल्या. राजन लाखे पुढे म्हणाले की, “लघुकथेनंतर मराठी साहित्यात रूढ झालेली अति लघू कथा ही कमीतकमी ओळींमधून मोठा आशय व्यक्त करते. ‘अल्याड-पल्याड’मधील अलक या ममता, आपुलकी, प्रेम या भावनांचा आविष्कार करणाऱ्या असल्याने या लेखनाची फलनिष्पत्ती प्रेरणादायी आहे!” दीपप्रज्वलन आणि योगिनी कुलकर्णी यांनी सादर केलेल्या शारदास्तवनाने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. विजय सातपुते यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. हर्षदा देशपांडे यांनी संयोजनात सहकार्य केले. नीलेश कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. किशोरी देशपांडे यांनी आभार मानले.